
सरपंच रजनी पाटील यांचा पुढाकार : जळगाव जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
अमळनेर : ‘गाव हा विश्वासाच नकाशा, गावावरुन देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदसा येईल देशा..!’ असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून दिला आहे. राष्ट्रसंतांचा हा संदेश प्रत्येक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच रजनी सुरेश पाटील यांनी आमोदे गावात केला असून ग्रामप्रशासनाच्या सहकार्याने संपूर्ण गावाला गेल्या दोन वर्षापासून मोफत मुबलक आरओ प्लांटचे शुद्ध व थंड पाणी दिले जात आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने सर्वत्र या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे.

.
रजनी पाटील यांनी गावाला शुद्ध पाणी मिळावे म्हणून उपसरपंच सुरेखा पाटील, ग्रामसेवक विजय माळी, सदस्य महानंदा सुशिल पाटील, लीना जितेंद्र पाटील, अमोल राजेंद्र पारधी, राजेंद्र भगवान पाटील, रुख्माबाई बन्सिलाल पाटील, सविता राजेंद्र पाटील यांना विश्वासात घेऊन हे कार्य पूर्णत्वास नेले. या कार्याला संपूर्ण ज्येष्ठ, श्रेष्ठ ग्रामस्थांचे विशेष सहर्काय लाभले.
प्रत्येक उन्हाळ्यात अमळनेर तालुक्यातील बऱ्याच गावांना पाणी टंचाई भासत असते. दोन ते तीन किमी अंतरावरुन पाणी आणावे लागते, शिवाय बऱ्याच गावांना टँकरने पाणीपूरवठा केला जातो. एवढे असूनही सरपंच रजनी पाटील यांच्या योग्य नियोजनाने आमोदे गावाला पाणीटंचाईची झळ पोहचली नाही.
बऱ्याच गावांना आरओ प्लांट बसविले आहेत, मात्र जे सुरू आहेत त्यांच्या ठेकेदारांकडून काही पैसे घेऊनच पाणी ग्रामस्थांना दिले जाते. मात्र आमोदे ग्रामपंचायततर्फे संपूर्ण गावाला मुबलक प्रमाणात मोफत आरओचे शुद्ध व थंड पाणी दिले जात आहे. उन्हाळ्याची सुरूवात झाली असून गावकऱ्यांना शुद्ध व थंड पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.