
अमळनेर:- तालुक्यातील डांगर, जानवे, मारवड परिसरात तसेच पिंपळे बु. व खु. भागात सोमवारी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वाऱ्याचा सर्वाधिक फटका बाजरी, मका, दादर आणि गव्हाच्या पिकांना बसला असून, अनेक ठिकाणी उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने तातडीने मदतीसाठी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना मोठा फटका
या परिसरात काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड करून त्यांच्यावर आवश्यक ते तांत्रिक उपाययोजना केल्या होत्या. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने काही तासांतच मेहनतीवर पाणी फेरले. विशेषतः बाजरी आणि मक्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, गहू पिकावरही परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी या पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला होता, परंतु या संकटामुळे त्यांच्या हातात काहीच उरणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
लवकरात लवकर पंचनामे करा
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नुकसानाची पाहणी सुरू केली असून स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू केले असले, तरी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.




