
उपविभागीय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी सात्री ग्रामस्थांच्या बैठकीत दिला सूचना वजा इशारा…
अमळनेर : सात्रीला आग लागली तेव्हा अग्निशमन दलाची गाडी फसली होती. भविष्यात काहीही संकट येऊ शकते त्यामुळे रस्ता अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही पक्षानी सामंजस्याने रस्त्याला संमती द्यावी अन्यथा प्रशासन कायद्याने निर्णय घेईल त्यावेळी शेतकऱ्यांचा फायदा होईल की नुकसान ते सांगता येणार नाही अशा सूचना वजा इशारा उपविभागीय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी अधिकारी व सात्री ग्रामस्थांच्या बैठकीत दिला. यावर दोन्ही बाजूकडून ४० फूट रुंदीचा रस्ता देण्यास प्राथमिक चर्चेत संमती देण्यात आली. बुधवारी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी व रस्त्याची मार्किंग करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्य पूर्वी काळापासून रस्ताच नसलेले सात्री हे महाराष्ट्रातील आगळे वेगळे गाव आहे. हे गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणात बुडीत क्षेत्रात आहे आणि पुनर्वसनही होत नाही. नुकतीच लागलेली आग , तीन चार जणांचा उपचाराअभावी झालेला मृत्यू, साथीचे रोग , पावसाळ्यात गर्भवती महिलांचे इतरत्र स्थलांतर करावे लागते , शालेय विद्यार्थ्यांची शाळा बंद होते , इतर कामे ठप्प होऊन गावाचा संपर्क तुटतो म्हणून पर्यायी रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.
या गावाला आधी गिरणा पाटबंधारे प्रकल्पात पाट चारी साठी भूसंपादन करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आणि पाट चारीला पाणीच येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी पुन्हा त्या जमिनीवर ताबा बसवला आहे. याच पाटचारीच्या जागेवर पर्यायी रस्ता करण्याचे शासनाने ठरवले आहे. मात्र पाट चारी सुरू असल्याचे उच्च न्यायालयाला दर्शवून या कामाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र सत्य परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यांनतर उच्च न्यायालयाने रस्त्याला नडणारे अतिक्रमण काढू शकतो असे निर्देशित केले आहे. तसेच गिरणा पाटबंधारे प्रकल्पात असलेले सर्व क्षेत्र तापी महामंडळात वर्ग झाल्याने त्यावर अधिकार तापी महामंडळ म्हणजे निम्न तापी प्रकल्पाचा आहे.अशा जमिनी शेतकऱ्यांना परत देता येत नाहीत असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे.असे प्रांताधिकारी मुंडावरे यांनी सांगितले. आणि रस्ता फक्त २५ फूट रुंदीचा आहे. त्याच्या सोबत दोन्ही बाजूला गटारी कराव्या लागणार असल्याने सुमारे ४० फूट रुंदीचा रस्ता मोकळा करावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी संमतीने ४० फूट रुंद रस्त्याला परवानगी द्यावी अन्यथा प्रशासन आमच्या पद्धतीने कारवाई करेल असा इशाराही दिला. प्राथमिक स्तरावर झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंकडून होकार दर्शविण्यात आला असून बुधवारी सर्व संबंधित अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी व रस्त्याची मार्किंग करणार आहेत.
या बैठकीस तहसीलदार रुपेशकुमार सुराणा ,नायब तहसीलदार कुलकर्णीं , निम्न तापी प्रकल्पाचे उप कार्यकारी अभियंता जितेंद्र याज्ञीक , मंडळाधिकारी वाय. एच. न्हाळदे , ग्राममहसुल अधिकारी परवर तडवी , सरपंच महेंद्र बोरसे , पोलीस पाटील विनोद बोरसे , राजेंद्र पाटील ,पुनिलाल पाटील , मनोहर पाटील ,संजय पाटील ,नईम शेख हजर होते.