
अमळनेर : तालुक्यातील पिंपळे येथे मध्यरात्री दीड वाजता अचानक पोलिसांनी जुगारावर धाड टाकली अन धावपळीत एक विहिरीत पडला तर दुसऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली.
पिंपळे येथे सार्वजनिक जागी पथदिव्याखाली पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. जुगार खेळणारे आणि त्यांची गम्मत पाहणाऱ्यांची गर्दी आजूबाजूला होती. पोलीस पाहताच सर्वांची भंबेरी उडाली. स्वतःला वाचवण्यासाठी जो तो पळत सुटला…कोणी शेतात …कोणी रस्त्यावर …कोणी गल्लीत पळत सुटले. पोलीस देखील त्यांच्यामागे पळत होते. पत्ते खेळणारे काही सापडले अन बघणारे पळत सुटले. पळता पळता एक विहिरीत जाऊन पडला. पाईपला धरून जीव मुठीत घेऊन बसला होता. पळणाऱ्यांना आपल्या मागचा गडी कुठे गायब झाला याची शंका आली. आवाज दिला तर पोलीस पकडतील म्हणून विहिरीतील व्यक्ती शांत होती. अखेरीस इतरांना कळल्यावर विहिरीत पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढले.
तर एक जणांचा पळता पळता पाय मुरगळला. कसातरी तो घरी पोहचला. सकाळी त्याचा पाय दुखू लागल्याने त्याला दवाखान्यात आणण्यात आले. पाय फ्रॅक्चर झाल्याने त्याला प्लास्टर लावण्यात आले. जुगार दुसरेच खेळले आणि शिक्षा मात्र बघणाऱ्यांना मिळाली.




