
अमळनेर : कुस्तीत स्टॅमिना आणि बुद्धी लागते. तगड्या पहेलवानाला ताकद जास्त असल्याने डाव मारता येत नाही मी आधी थकवतो मग हरवतो हे माझ्या कुस्तीचे रहस्य असल्याची माहिती देवा थापा या पहेलवानाने अमळनेर येथे पत्रकारांना सांगितली.
बालवीर व्यायामशाळा व भरत पवार यांनी आयोजित कुस्त्यांच्या स्पर्धेत नेपाळ चा देवा थापा आणि हरियाणाचा शेरा पहेलवान यांच्यात प्रमुख लढत २७ रोजी सायंकाळी ७ वाजता झाली यात देवा थापा विजयी झाले.
देवा थापा याचे वय अवघे २८ असून सुमारे १५ वर्षांपासून कुस्ती खेळत आहेत. त्याचे शिक्षण फक्त तिसरीपर्यंत झाले आहे. पंजाबचे गिरजितसिंग पहेलवान त्याचे गुरू आहेत. नेपाळ मध्ये कुस्तीला फार महत्व नाही. थापा आतापर्यंत सुमारे १० हजार च्या वर कुस्त्या खेळला आहे. अनेक कुस्त्यांमध्ये देवा थापा याने बलाढ्य पहेलवानाना थकवून पराभूत केले आहे. या रहस्यबद्दल तो म्हणाला की कुस्तीला डावपेच सोबत स्टॅमिना आणि बुद्धीही लागते. मैदानावर करत असलेल्या मनोरंजनाबद्दल तो म्हणाला की , अनेकदा बिना डावाची कुस्ती चालते तेव्हा लोक कंटाळतात. कुठलेच डावपेच बघायला मिळत नाहीत. त्यावेळी मनोरंजन आवश्यक असते.
आपल्या दिनचर्येबद्दल तो म्हणाला की, सकाळी ४ वाजता उठून रनिंग , दंड बैठक , त्यांनतर थंडाई घेतो. जेवण स्वतःच बनवतो. पहेलवानाला डायट आवश्यक आहे. पहेलवान होणे सोपे नाही , ब्रम्हचर्य आवश्यक आहे.
दरम्यान हरियाणा केसरी शेरा उर्फ प्रतापसिंग पहेलवान म्हणाले की, बाप आणि गुरू जर चांगला मिळाला तर पहेलवान आपल्या आयुष्यात अयशस्वी होणार नाही. शेरा पहेलवान १० वी पर्यंत शिकला असून त्याचे गुरू जम्मू मधील स्वरमसिंग पहेलवान आहेत. सकाळी ४ वाजेला उठून रनिंग त्यांनतर १ हजार ते १५०० दंड बैठक काढतो. आवळा मुरंबा खाऊन त्यांनतर मातीत सराव करतो. आजच्या तरुणांना कोणताही खेळ खेळवा मात्र व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. वाईट कामांपासून मुलांना दूर ठेवण्याचे आवाहन त्याने पालकांना केले आहे. महाराष्ट्रात आणि देवा थापा याच्याशी पहिल्यांदा कुस्ती होत आहे असेही तो म्हणाला.

