
४ गावाना टँकर सुरू ,४ गावांचे टँकर प्रस्ताव पाठवले तर सहा गावांना ९ विहिरी अधिग्रहित…
अमळनेर : उन्हाचा पारा वाढल्याने भूजल पातळी खालावत चालली असून तालुक्यात चार गावांना टँकर सुरू झाले आहेत तर सहा गावांना विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे.

तालुक्यातील डांगर ,जानवे , सबगव्हाण आणि तरवाडे या गावांना टँकर ने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर मंगरूळ , चोपडाई , कोंढावळ या गावचे टँकर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत. सहा गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तर टँकर भरण्यासाठी अमळनेर नगरपालिका , धावडे ग्रामपंचायत आणि भिलाली ग्रामपंचायतींच्या विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

मंगरूळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. मात्र गावकऱ्यांनी बोरी नदीवरून पाणी नको तापी नदीवरून पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केल्याने पाणी पुरवठा योजना रखडली आहे. त्यामुळे आज टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील विहिरी नाले आणि जलस्रोतांची भूजल पातळी खालावली आहे. खासदार स्मिता वाघ यांनी पांझरा नदीला अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी धुळे जिल्हाधिकारींना पत्र पाठवून अमळनेर तालुक्यातील १६ गावांच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी किती पाणी सोडावे लागेल याबाबत अहवाल पाठवून पाणी सोडण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.





