
अमळनेर : बापाचे ऑपरेशन नव्हे तर ऑपरेशन सिंदूर महत्वाचे आहे ,बाप नव्हे भारत माता महत्वाची , कुटुंब नव्हे तर देश महत्वाचा म्हणत सुटीवर आलेले सैनिक वरिष्ठांच्या आदेशाने आपल्या कर्तव्यावर रवाना झाले आहेत. माजी सैनिकांच्या खान्देश रक्षक संघटनेने त्यांना आनंदाने आणि अभिमानाने रवाना केले आहे. झाडी येथील जगदीश विश्वास पाटील यांना तर त्यांच्या बिहार येथील कर्तव्यावर बोलवण्याऐवजी सरळ जम्मू काश्मीर येथे बोलावण्यात आले आहे.

अनेक सैनिक सुट्या घेऊ न गावी आले होते.नारायण चौधरी आणि संभाजी पाटील हे दोघे आपल्या वडिलांच्या ऑपरेशन साठी सुटीवर आले होते. पण आता ते ऑपरेशन सिंदूर साठी रवाना झाले आहेत. पिंपळे येथील दिनेश नानभाऊ पाटील व भिकन नानाभाऊ पाटील हे दोघे बंधू कौटुंबिक समस्येसाठी सुटीवर आले होते. युद्ध सुरू होताच दोघे भाऊ घरची समस्या सोडून देशाची समस्या सोडवायला रवाना झाले आहेत. त्याच प्रमाणे गणेश कुरकुरे , मोहन पाटील ,खुशाल पगारे , गौतम सैंदाणे हे देखील सुटीवरून कर्तव्यावर परत गेले आहेत.

शिरूड येथील भटू झुबर पाटील यांना तातडीने बोलावणे आले. त्यांना पुण्याहून रवाना व्हायचे होते म्हणून ते आपले मित्र धनराज पाटील यांच्या सोबत खाजगी वाहनाने जळगाव विमान तळावर जात असताना उशीर झाला अखेर विमानतळावर कळवल्यानन्तर विमान काही वेळ थांबवण्यात आले होते.
आपल्या कर्तव्यावर परत जाणाऱ्या सैनिकांना राजेंद्र यादव , जितेंद्र सोनवणे , रमेश चौधरी , ईश्वर चौधरी , चंद्रकांत पाटील , धनराज पाटील , विजय सूर्यवंशी , नामदेव यादव , जगदीश पाटील , कैलास पाटील या माजी सैनिकांनी त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जल्लोषात सत्कार करून भारत माता की जय , वंदे मातरम , हिंदुस्थान जिंदाबाद , पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आनंदाने रवाना केले.


