
अमळनेर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मिळणार दिलासा
अमळनेर:- पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून १२ मे रोजी ३५० दलघफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. हे पाणी अमळनेर, शिंदखेडा, तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये चार ते पाच दिवसांत पोहोचणार असून, त्यामुळे या भागातील भीषण पाणीटंचाईला काहीसा दिलासा मिळणार आहे.
धुळे तालुक्यातील कुसुंबा, खेडे, वार, वरखेडी, मोराणे, भिलाणे, मुडावद, अकलाड मोराणे, धुळे, आर्वी, जापी, कौठळ-१ व २, शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा, बेटावद, पढावद, अजंदे बु, वाघोदे, अमळनेर तालुक्यातील मांडळ, मुडी प्र डांगरी, बोदर्डे, कळंबु, ब्राम्हणे, भिलाली, शहापूर, डांगर बु, एकतास, तांदळी, निम, जवखेडा वावडे, एकलहरे, लोण खु. व लोण ब्रु. या गावांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आवर्तन सोडण्याचे आदेश दिले.
सावधगिरीचे आदेश आणि तयारी
आवर्तन सोडण्याआधी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या सर्व बंधाऱ्यांवरील फळ्या काढण्याचे आदेश देण्यात आले. याची जबाबदारी गावकऱ्यांसह विविध शासकीय विभागांवर सोपवण्यात आली आहे. पाणी अडवले जाऊ नये यासाठी बंधाऱ्यांचे फोटो घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, कोणीही अनधिकृतपणे पाट्या टाकल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी नदीपात्रात शेतीसाठी टाकलेले पाणीपंप व मातीचे भराव तातडीने काढावेत, असेही आदेश दिले गेले आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांनी विहिरीवरील व नदीपात्रातील वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

एकत्रित यंत्रणा कार्यान्वित
पाणी गावांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, तहसीलदार, पाटबंधारे विभाग, ग्रामविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तलाठी, विद्युत वितरण कंपनी व पंचायत समिती यांच्यावर आहे. आवर्तन सुरु होण्याआधी तहसीलदार, साक्री यांनी सर्व यंत्रणांची बैठक घेतली होती.
तांदळी कोल्हापूर बंधाऱ्याच्या पाट्या अद्याप काढल्या नाहीत
तांदळी कोल्हापूर बंधाऱ्याच्या पाट्या आदेश देऊनही काढलेल्या नाहीत याबाबत मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जिभाऊ पाटील धुळे पाटबंधारे खात्याचे व अक्कलपाडा धरणाचे शाखा अभियंता प्रकाश गवते यांनी ही माहिती दिली असून तातडीने या पाट्या काढल्या नाहीत तर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
धरणातून सोडलेले पाणी योग्यरित्या पोहोचवण्यासाठी आणि कुठेही अडवले जाणार नाही याची खात्री करण्यासाठी यंत्रणा प्रत्यक्ष पाहणी करत राहणार आहे. पाणी थेट शेवटच्या गावांपर्यंत पोहोचल्याची खात्री झाल्यावरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.




