
अमळनेर : शहरातील सानेनगर भागातील दीपाली सुभाष पाटील या तरुणीने १५ रोजी पहाटे ३:४० वाजता स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

दीपालीचा गडखांब येथील तरुणाशी १७ रोजी विवाह होणार होता. १५ रोजी तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम आयोजित केला होता. १४ रोजी रात्री तिच्या घराबाहेर गाणे म्हटले गेले त्यात दीपालीने नृत्यही केले होते. मात्र भल्या पहाटे तिच्या आईला ती दिसून आली नाही. बाजूच्या खोलीत लाईट लावलेला होता. तिने गळफास घेऊन तिचे आयुष्य संपवले होते.

१५ ला मेहंदी ,१६ ला हळद, १७ ला लग्न घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची तयारी झाली होती. चार पाच दिवसांपासून रात्री लग्नाची गाणी म्हटली जात होती. नियतीला हे मान्य नव्हते की काय मेहंदी आणि हळदीच्या रंगांचा ढंग बिघडला. ज्या खांद्यावर डोके ठेवून आठवणींना अश्रूंच्या रूपाने वाट मोकळी करून लेकीची शृंगाराने नटलेल्या रुपात बीदाई होणार होती त्या लेकीची अंत्ययात्रा खांद्यावर नेण्याची वेळ सुभाष पाटलांवर आली. नवरी प्रमाणे दिपालीच्या अंगावर शृंगार चढवून तिच्या नववधूच्या साहित्यासह तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी सारा गाव हळहळला होता उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
सुभाष पाटील यांची पहिल्या पत्नीचे आजाराने निधन झाले.तिच्यापासून एक मुलगी होती. तिला आजी आजोबांनी वाढवले. तिचे लग्न झाल्यानन्तर तिला गळफास देऊन मारून टाकले होते. दीपाली दुसऱ्या पत्नीची मुलगी तिचाही गळफासाने मृत्यू झाला. दिपालीच्या जाण्याने सुभाष पाटलांच्या जीवनात काळोख झाला आहे.




