
दोन मोठ्या क्रेन मागवल्या, २०० मजूर लागले कामाला, तिसऱ्या ट्रॅक वरून वाहतूक सुरू करणार…
अमळनेर : रेल्वे स्थानकावर १५ मे दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी मालगाडीचे ७ डब्बे पट्ट्यावरून खाली घसरल्याची दुर्घटना घडली. खासदार वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन लवकर प्रयत्न करून वाहतूक सुरळीत करा आणि प्रवाश्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या असे निर्देश दिले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे.

या घटनेमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले असून, रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
आमदार अनिल पाटील यांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, अशी सूचना रेल्वे प्रशासनाला केली आहे. नंदुरबारहुन एक आणि भुसावळहुन एक अशा दोन मोठ्या क्रेन मागवण्यात आल्या आहेत. अमळनेर ते भोरटेक दरम्यान रेल्वे ट्रॅक वरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. सुमारे २०० मजूर मागवून कोळसा काढण्यात येत आहे. पाच ते सहा तासात तिसऱ्या ट्रॅक वरून हळूहळू वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.





