
५ हजार २०० रुपये हिसकावले, तिघांना पोलिसांनी केली अटक…
अमळनेर : संत सखाराम महाराज यात्रेत कापड विक्रेत्याला लाकडी बॅट ने मारहाण करून तिघांनी त्याच्याकडून ५ हजार २०० रुपये हिसकावून नेल्याची घटना १४ रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान रोज वेगवेगळे वादाचे प्रकार यात्रेत घडत असल्याने यंत्रणेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

धुळे येथील आझाद नगर मधील अरशद अकबर शहा व त्याचा भाऊ अफजल याने संत सखाराम महाराज यात्रेत बोरी नदी पात्रात कपड्याचे दुकान टाकले आहे. रात्री साडे तीन वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसम त्यांच्या दुकानाच्या बाहेर भांडण करत होते. म्हणून अर्षद व त्याचा भाऊ कपडे विकल्याचे ५ हजार २०० रुपये असलेली पिशवी गळ्यात टाकून बाहेर आले आणि भांडण करणाऱ्यांना जाब विचारला असता तिघांना राग आला आणि त्यांनी हा आमचा ईलाका आहे. आम्ही जे बोलणार तेच होणार असे सांगत एकाने हातातील लाकडी बॅट अर्षद च्या डोक्यात व पाठीवर मारुन दुखापत केली. नन्तर दोन्ही भावाना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत गळ्यातील ५ हजार २०० रुपयांची पिशवी पळवून नेली.

अर्षद याने अमळनेर पोलीस स्टेशनला तीन अज्ञात तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५१(२), ३५२ , ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , पोलीस निरीक्षक राजू जाधव , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , प्रशांत पाटील , निलेश मोरे यांच्या पथकाला संशयित तरुणांना ताब्यात घ्यायला सांगितले. पोलिसांनी सतीश पुनमचंद पाटील वय २१ रा शनीपेठ पैलाड , चेतन उर्फ सत्तू किरण धोबी वय २० रा शिवाजीनगर पैलाड , शंकर संजय पाटील वय १९ रा कृष्णा पेट्रोलपंप जवळ पैलाड याना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी लुबाडणूक केल्याची कबुली दिली. आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्या यलमाने यांनी आरोपीना २० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

