
८० फुटी रस्त्याचे ठेकेदार व नगरपरिषद सुस्त झाल्याने नागरिकांचे यंदाही चिखलामुळे होतायेत हाल…
अमळनेर:- शहरातील राम नगर परिसरातील ८० फुटी रस्त्याचे काँक्रीटीकरण काम रखडले असून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने काळी माती वर येऊन अवकाळी पावसामुळे चिखल झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भालेराव नगर- राम नगर परिसरात 80 फुटी नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे काम थांबले आहे. ठेकेदाराने क्रॉंकीट रस्त्यावर वाहने चढ-उतार व्हावी म्हणून काळी माती टाकून उतार-चढाव करून दिला.मात्र तोच उतार चढाव पाऊस पडल्याने वाहन धारकांचे हाल पाहत आहे. चढावर मुरुम टाकावा की काळी माती याबाबत संबंधित ठेकेदाराला नगरपरिषदेने समज द्यावी अशी मागणी संतप्त नागरिक करीत आहेत. सहा महिन्यापासून सदर काँक्रीटीकरण जैसे थे असून संबंधित ठेकेदाराला नगरपरिषदेने समज द्यावी व तात्काळ काम सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम या भागात सुरू असून खोदकामामुळे काळी माती वर आल्याने त्यातच अवकाळी पावसाची भर पडल्याने मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर कसरत होत आहे. त्याठिकाणी मुरूम टाकण्याची व्यवस्था पालिकेने करावी.
प्रतिक्रिया…
सदर काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या असून आठ दिवसात काम सुरू न झाल्यास नोटीस देण्यात येईल. – डीगंबर वाघ, अभियंता – बांधकाम विभाग, अमळनेर नगरपरिषद
प्रतिक्रिया…
राम नगर व परिसरात ही नागरिकच राहत असून रस्त्याचे काम होईपर्यंत यंदा वाहनधारकांचे हाल होऊ नये म्हणून रस्त्यावर मुरूम टाकण्यात यावा, ही विनंती- महेश संजय पाटील, नागरिक





