
लायन्स क्लब,रोटरी क्लब,भाजप सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली भोजन व जलसेवा
अमळनेर-येथील मालगाडी च्या अपघातामुळे रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर काम करीत असताना,त्यांच्या मदतीला अमळनेर शहरातील विविध संस्था व सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून गेल्याने अमळनेरकरांच्या दातृत्वाची अनुभूती रेल्वे प्रशासनासह त्यांच्या अधिकारी व कामगारांना आली.
विशेष म्हणजे या सामाजिक सेवेमुळेच आमची क्षुधाशांती व तृष्णातृप्ती होऊन आम्ही जोमाने काम करू शकलो अशी भावना असंख्य कामगारांनी व्यक्त केली.प्रामुख्याने लायन्स क्लब,रोटरी क्लब,खासदार स्मिता वाघ व भाजप सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याठिकाणी नास्ता, भोजन व जलसेवेचे योगदान दिले.

भोजन देऊन लायन्स क्लबने दिला मानवतेचा संदेश अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून लायन्स क्लब, अमळनेर शी संपर्क साधून, अपघातस्थळी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती.यास लायन्स क्लबने तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत, दिनांक १६ मे रोजी सकाळी अपघातस्थळी उपस्थित सर्व अधिकारी, मजूर व कामगारांना गरमागरम पुरी-भाजीचे जेवण वाटप करण्यात आले.या उपक्रमात क्लबचे अनेक सदस्य स्वतः उपस्थित राहून नियोजन, समन्वय व वाटपात सहभागी झाले.एकूण ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

रेल्वे प्रशासनाने लायन्स क्लबच्या या तातडीच्या सेवाभावाचे कौतुक करत त्यांचे विशेष आभार मानले. लायन्स क्लब अमळनेरचे “We Serve” हे ब्रीदवाक्य या सेवाकार्यातून प्रत्यक्षात उतरले आहे.या उपक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन होत आहे.
रोटरी क्लब तर्फे पाणी व ज्यूस वाटप रेल्वे प्रशासनाने रोटरीचे प्रीतपालसिंग बग्गा व ताहा बुकवाला यांच्याकडे मदतीसाठी हाक दिल्याने रोटरी क्लब अमळनेरने सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेत दोन दिवस रेल्वे अपघात स्थळी कार्यरत सुमारे ७०० कामगारांना पिण्याचे पाणी व कैरी पन्हे वाटप केले. रोटरी क्लबच्या या सामाजिक कार्याचे अधिकारी वर्गाने कौतुक केले.या उपक्रमात अध्यक्ष ताहा बुकवाला यांच्यासह प्रितपाल सिंग बग्गा, देवेंद्र कोठारी, कीर्ती कुमार कोठारी, आशीष चौधरी, रोहित सिंघवी व सर्वे रोटरी सभासदांचे सहकार्य लाभले.
अपघातस्थळी सर्व कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली. या नाश्त्याचे वाटप भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वयंसेवाभावनेतून केले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे जानवे मंडळ अध्यक्ष जिजाब पाटील, शहर मंडलाचे अध्यक्ष योगेश महाजन, खा.शि मंडळाचे कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल,निवास मोरे,युवा मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे, सरचिटणीस समाधान पाटील, सौरभ पाटील आदी उपस्थित होते.




