
गेल्या वर्षी छापलेली २ री ते ८ वी ची पुस्तके वाया जाणार…
अमळनेर : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू झाली आहे. इयत्ता पहिलीची पुस्तके या वर्षांपासून बदलण्यात आली आहेत. मात्र गेल्या वर्षी कमी केलेला दप्तराचा बोजा यावर्षीपासून पुन्हा वाढणार आहे. शिक्षणमंत्री बदलताच सर्व विषयांचे एकच असलेले पुस्तक आता पुन्हा विषयवार स्वतंत्र करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी शासनाने पुस्तकांचा दप्तरातील बोजा कमी व्हावा म्हणून इयत्ता आठवीपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक बनवून त्याचे चार भाग करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी तीन तीन महिन्यांकरिता एकच पुस्तक शाळेत आणत होता. त्यातच मराठी , इंग्रजी , इतिहास , भूगोल , गणित ,विज्ञान असे विषय होते. टिपणी काढण्यासाठी कोरे पाने देखील दिले होते. या वर्षांपासून जरी २ री ते ८ वी पर्यंत अभ्यासक्रम बदलला नसला तरी पुस्तक रचना बदलली आहे. सर्व विषयाची स्वतंत्र पुस्तके छापण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा मुलांच्या दप्तराचे पाठीवरचे ओझे वाढणार आहे. तसेच गेल्या वर्षी झालेला पुस्तकांचा खर्च वाया जाणार आहे. त्याच्या आधी देखील छापलेली पुस्तके वाया गेली होती. मुलांकडून परत घेतलेली ती पुस्तके रद्दीत गेली. दरवेळी शिक्षणमंत्री बदलले की नवीन काहीतरी प्रयोग शिक्षण विभागावर होतो. आणि अवाजवी खर्च केला जातो. यंदा देखील गेल्या वर्षी छापलेली पुस्तके वाया जाणार असून नवीन स्वतंत्र विषयाची पुस्तके दिली जाणार आहेत.
२०२५-२६ पासून पहिली ला सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार १ ली ची पुस्तके बदलली आहेत.
२०२६-२७ या वर्षात २ री ,३ री ,४ थी व ६ वी ची पुस्तके बदलणार आहेत. २०२७-२८ मध्ये ५ वी ,७ वी,९ वी , ११वी ची पुस्तके बदलणार आहेत. तर २०२८-२९ मध्ये ८ वी , १० वी , १२ वी ची पुस्तके बदलणार आहेत.
३ ते ६ वर्ष वयाच्या मुलांसाठी आता आधारशिला बालवाटिका १,२,३ असा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असेल. राज्यात १ लाख १० हजार ६३१ अंगणवाडी केंद्र आहेत. ३ ते ६ वयोगटात ३० लाख विद्यार्थी आहेत. अंगणवाड्यांचे स्थानान्तरण जिल्हा परिषदेच्या रिकाम्या खोल्यांमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत.




