
लोकप्रतिनिधींचा नातलग असल्याने ठेकेदाराला पालिकेची मुभा ?
अमळनेर:- शहरात अनेक विकासकामे होत असून फक्त ठेकदारांच्या मनमर्जीने कामे सुरू असल्याने जनतेला मात्र त्रास होत आहे. भालेराव नगरच्या पाठीमागे ८० फुटी रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून ठप्प पडले असून ठेकेदार लोकप्रतिनिधींचा नातलग असल्याने त्याला पालिकेने मुभा दिली आहे का ? असा सवाल विचारला जात आहे.

शहरातील भालेराव नगरच्या पाठीमागे ८० फुटी रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसापासून रखडले असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसात काम सुरू न केल्यास ठेकेदाराला नोटीस देणार असल्याचे १५ मे रोजी पालिकेचे अधिकारी व अनेकांसाठी महत्त्वाचे असलेले अभियंता वाघ यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर कोणतीच हालचाल नसल्याने केवळ लोकप्रतिनिधींचा नातलग असल्याने पालिका प्रशासन ठेकेदाराला मुभा देत आहे का ? असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत. सदर ठेकेदाराने कामासाठी पावसाळ्याचा मुहूर्त काढल्याची माहिती असून मुख्याधिकारी फक्त फॉलो अप घेतो असेच सांगत असल्याने पालिका प्रशासन सुद्धा या ठेकेदारांच्या मर्जीने सुरू असल्याचे चित्र आहे.

ठेकेदारांच्या मनमानीमुळे आमदारांची नाचक्की…
तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विकासकामे व बांधकामे सुरू असून मात्र ही बहुतांश कामे फक्त मर्जीतल्या आणि लाळघोट्याना दिल्याने ठरावीक वर्ग लोकप्रतिनिधींवर नाराज असल्याचे चित्र आहे. हे मर्जीतले ठेकेदार मनमानी पद्धतीने कामे करत असल्याने ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. तसेच आमदारांची माणसे कामे करत असल्याने अधिकाऱ्याची ही गळचेपी होत आहे. एका विभागावर तर फक्त आमदारांच्या राजुचाच राज चालत असल्याचे चित्र आहे. मात्र या बोगस कामांमुळे तालुक्यात आमदारांचीच नाचक्की होत आहे.




