
माझा शेतकरी माझा अभिमान शेतकरी प्रेरणास्थळाचे, भव्य गोडाऊन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेचे भूमिपूजन संपन्न…
अमळनेर:- कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्पन्नातून लोकोपयोगी कामे उभी करावी असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी केले.प्रमुख अतिथी म्हणून आ.अनिल दादा पाटील हे उपस्थित होते.याप्रसंगी बाजारसमितीच्या आवारात माझा शेतकरी माझा अभिमान शेतकरी प्रेरणास्थळाचे, भव्य गोडाऊन शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले.

“शेतकऱ्यांनी विष युक्त पिकांचे उत्पन्न थांबवून आरोग्याच्यादृष्टीने सकस पिकांकडे वळणे आवश्यक आहे.बाजार समितीने आपल्या उत्पन्नातून सभासदांच्या व शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सोयी, शेतीमालासाठी गोडाऊन निर्माण करण्यास प्राधान्य द्यावे ” असेही यावेळी ना.बाबासाहेब पाटील यांनी आवाहन केले. ” शासनाने शेतकऱ्यांच्या विविध थकबाकी लवकर अदा केल्यास शेतकरी आनंदी होईल,अमळनेर बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीने विविध योजनांना प्राधान्याने पाठबळ द्यावे असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले. प्रास्ताविकात सभापती अशोक पाटील यांनी अमळनेर बाजार समिती ही शेतकरी हिताचे निर्णय घेत व्यापारी ते हमाल मापाडी, गुमास्ता या सर्वांना सोबत घेऊन मार्गक्रमण करीत आहे असे सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जिल्ह्यात विभागात व राज्यात झालेला नावलौकिकाबद्द्ल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,उपसभापती सुरेश पाटील यांचेसह संचालक मंडळाचा सत्कार केला. मान्यवर लोकप्रतिनिधी यांना बाजार समितीतर्फे महात्मा बळीराजा यांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन संचालक हिरालाल पाटील यांनी केले.

याप्रसंगी मंचावर जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी जि प सदस्या सौ.जयश्री पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय नेमाडे, माजी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील,सौ. रिता बाविस्कर,यांचेसह विभागीय निबंध संभाजी निकम, जिल्हा निबंधक गौतम बलसाने, ऑडिटर के डी पाटील आदींसह कृ. ऊ.बा चे संचालक डॉ.अनिल शिंदे, डॉ.अशोक पाटील,समाधान धनगर,सौ.पुष्पा पाटील ,सौ. सुषमा पाटील,भाईदास भील, प्रकाश अमृतकार, ऋषभ पारेख, गट सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, सचिव डॉ .उन्मेष राठोड आदि उपस्थित होते. याप्रसंगी आदर्श सरपंच नरेंद्र पाटील व नितीन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.व्यापारी असोसिएशन,तसेच हमाल मापाडी संघटना, गटसचिव संघटनेतर्फे ना.बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.




