
बस पुन्हा सुरू, जि.प. बांधकाम विभाग निगरगट्टच…
अमळनेर: तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर काटेरी झुडपे वाढल्याने प्रवाश्यांना धोका वाढला होता.याबाबत अनेकवेळा मागण्या करूनही आणि वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होऊन निगरगट्ट जिप बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.अखेर डांगरी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ही झुडपे काढून घेतली.बस पुन्हा सुरू झाल्याने गैरसोय दूर झाली.

तालुक्यात ग्रामीण भागातील अनेक रस्त्याची दुरावस्था झाली असून बहुतांश रस्ते काटेरी झुडुपात हरवल्याचे चित्र आहे. तर अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. प्रत्येक रस्त्याला देखभाल दुरुस्ती कालावधी असतो आणि ठेकेदाराने खराब झालेले रस्ते दुरुस्ती करावी किंवा खड्डे बुजवावेत असे कार्यारंभ आदेशात नमूद असते. मात्र टक्केवारीखाली दबलेले कर्मचारी नादुरुस्त रस्त्यांकडे ढुंकूनही बघत नाहीत. बस बंद होईपर्यंत रस्ते खराब होतात इथपर्यंत बांधकाम विभाग निर्ढावलेला आहे. जिप सदस्य , पस सदस्य नसल्याने कर्मचारी मुजोर झाले आहेत. आता आमदार महोदयांनी तरी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

याबाबत विविध माध्यमात वृत्त प्रसिद्ध होऊन संबंधित विभागाला जाग आली नसली तरी डांगरी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत जेसीबी लावून मारवड ते डांगरी रस्त्यालगतची काटेरी झाडे काढून टाकली आहे. त्यामुळे बंद पडलेली डांगरी बससेवा पुन्हा सुरू होऊन प्रवाश्यांची सोय झाली आहे. यासाठी मारवड व परिसर विकास मंचाचे त्यांना सहकार्य लाभले. आता तालुक्यातील इतर रस्त्याचे भाग्य कधी उजळेल याच्या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.

