
अमळनेर:-भारत देशातील 26 राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या अखिल भारतीय लीनेस क्लब च्या चेअरमनपदी अमळनेरच्या डॉ. मंजिरी रविंद्र कुलकर्णी या विराजमान झाल्या असून यानिमित्ताने अखिल भारतीय लिनेस क्लब या नामांकित संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रथमच बहुमान प्राप्त झाला आहे.
लायन्स क्लब इंटरनॅशनल ने काही तांत्रिक कारणामुळे लायन्स क्लब इंटरनॅशनल ची लेडीज विंग “लायनेस क्लब” ही जगभरातील शाखा बंद करण्याचा निर्णय 2021 मध्ये घेतला होता.त्यावेळी जगभरातील लायनेस पुढे संस्थेचे काय करावयाचे हा एकच प्रश्न होता .त्यावेळी भारतातील चंडीगड येथील ईंदूजी मेहता , बेंगलोर येथील निरंजना भंडारी , मणिपूर येथील डॉ. कोमलिनी, चेन्नई येथील सुवर्णलताजी , मुंबई येथील शशी राजपाल व अमळनेर येथील डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी नवीन संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला.व सर्वांनी मोठ्या विश्वासाने अमळनेरच्या डॉ. मंजिरी कुलकर्णी यांचे वर फाउंडर प्रेसिडेंट म्हणून जवाबदारी सोपविली. त्यावेळी त्यांनी अथक प्रयत्न करून “ऑल इंडिया लिनेस क्लब ” या नावाने नवीन सेवाभावी संस्था स्थापन केली व 26 जुलै 2021 रोजी संस्था स्थापनेची घोषणा केली.
सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना तोंड देत खडतर प्रवासातून कार्य सुरू केले. संस्थेची स्वतंत्रपणे घटना तयार केली व त्याप्रमाणे कार्यप्रणाली सुरू करण्यात आली . त्यानंतर भारतातील सेवाभावी संस्थांचे संस्थेमध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली. सुरुवातीस अगदीच मोजक्या सदस्यासह चालू केलेली ही संस्था आज भारतातील 26 राज्यांमध्ये कार्य करीत असून 8 हजार च्या वर सदस्य आहेत.
नोव्हेंबर 2025 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या ऑल इंडिया लिनेस क्लबच्या कॉन्फरन्स मध्ये डॉ. मंजिरी कुलकर्णी यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली .त्यांचा कार्यकाल दोन वर्षाचा असून प्रथमच हा बहुमान डॉक्टर मंजिरी कुलकर्णीच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे. त्यामुळे अभिनंदनचा वर्षाव त्यांचेवर होत आहे
डॉ.मंजिरी कुलकर्णी या अमळनेरच्या दुर्गा हॉस्पिटल येथून वैद्यकीय सेवा कार्य करीत आहेत.ऑल इंडिया लीनेस क्लब या संस्थेचा परदेशातही विस्तार करून आपले कार्य सुरू ठेवण्याचा मानस डॉ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.




