
अमळनेर-तालुक्यातील वासरे येथील शेतकऱ्याने बँकेतून काढलेले 3 लाख रुपये ते बाजारात आंबे खरेदी करीत असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या हँडलला लावलेल्या पिशवीसह लंपास केल्याची घटना दिनांक 10 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की शिवाजी भानुदास पाटील वय 59 धंदा शेती, रा. वासरे ता. अमळनेर यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा अमळनेर या बँकेत खाते असुन त्यात ते शेतीतील आवकच्या पैशांचा भरणा करीत असतात. दिनांक 10 रोजी दुपारी 12.30 वाजेचे सुमारास शेतीत पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे तसेच रासायनिक खते खरेदी करणे असल्याने त्यांच्या सेंट्रल बैंक ऑफ इंडीया, शाखा अमळनेर या बँकेत पैसे काढण्यासाठी त्यांच्या दुचाकीने गेले होते.बँकेतून सुमारे 3,00,000/- रूपये रोख काढून सदर पैसे निळ्या रंगाची कापडी पिशवीत ठेवुन दुपारी 01.30 वाजेचे सुमारास बँकेतुन बाहेर पडले.

दुचाकीच्या हॅण्डलला सदरची पिशवी टांगुन बाजारपेठ परीसरात ते बि-बियाणे तसेच रासायनिक खते खरेदी साठी गेले होते.त्यानंतर आंबे घेण्यासाठी बाजारातील विजय शॉपी समोरील फळांच्या हातगाडीजवळ दुचाकी बाजुला लावुन पैशांची पिशवी हि गाडीच्या हॅण्डललाच टांगलेली ठेवुन त्यांनी आंबे खरेदी केले.गाडीजवळ ते आले असता गाडीला टांगलेली पैशांची पिशवी दिसली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती लंपास केली.याबाबत अमळनेर पोलिसात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ विनोद सोनवणे हे करीत आहेत.




