
वाळू चोरांना मिळतेय प्रशासनातील झारीतल्या शुक्राचार्यांची साथ…
अमळनेर: प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्यांनी व पडद्याआड दडलेल्या वाळू माफिया यांनी अवैध वाळू रगडून बक्कळ पैसा काढणे सुरू केल्याचे चित्र सध्या संपूर्ण तालुक्याला दिसत आहे.

शहरातील बोरी नदी पात्रातून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरूच आहे. महसूल प्रशासनाच्या वरदहस्तानेच हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट असून महसूल खात्याचा एकही कर्मचारी या भागात फिरकत नाही. तलाठी, सर्कल यांना दिवसरात्र सुरू असलेला वाळू उपसा दिसत नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजरोसपणे हा प्रकार सुरू असून प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. हिंगोणे शिवारातील बोरी नदी पात्रातील वाळू उपसून काही माफिया रुबजी नगर भागातील ओसाड भागात ठिय्या करत असून नंतर जेसीबीने डंपर मध्ये भरून वाळू इतरत्र रवाना करण्यात येत आहे. पलीकडच्या बिलखेडा गावच्या काठावरून ट्रॅक्टर नदीपात्रात उतरून जेसीबी किंवा माणसे लावून वाळू भरल्यावर सीताराम महाराज मंदिरामागून फाफोरे रस्त्यावर वाहने चढवली जातात. त्यानंतर काही माफिया फाफोरे पासून मंगरुळ कडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्ये ओसाड जागी वाळूचा ठिय्या करत आहेत. तर काही फाफोरे पासून शिरुड कडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्ये वाळू उपसून नंतर त्याची विल्हेवाट लावत आहेत. खळेश्वर मंदिरासमोरील स्मशान भूमीत बसवलेली भुते येणाऱ्या जाणाऱ्यांवर दिवसरात्र लक्ष ठेवून असतात. पद्धतशीरपणे वाळूची बेसुमार लूट सुरू असून यात प्रशासनातील अनेकांचे हात बरबटले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
वाळू माफियांची मौज मात्र नागरिक दहशतीत…
बोरी नदीपात्रातील वाळू उपश्यामुळे माफिया गब्बर होत असले तरी रस्त्यावरील नागरिक मात्र दहशतीत वावरत आहेत. शहरातील शहाआलम नगर भागात सध्या दिवसरात्र वाळूच्या ट्रॅक्टरची वर्दळ सुरू असून भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टर मुळे रात्री अनेकांची झोप उडाली आहे. तसेच फाफोरे भागातील रस्त्याचा फज्जा उडाला असून दिवसरात्र वाळूच्या वाहनांची भरधाव वेगाने वाहतूक सुरू असते, त्यामुळे एखाद्या दिवशी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाळूमुळे माफिया व यंत्रणेतील काही भ्रष्ट नोकरशहा खोऱ्याने पैसे ओढत असले तरी नागरिक मात्र दहशतीत आहेत.
तहसीलदारांची कारवाई सुरू मात्र कोणालाच कारवाई दिसेना…
वाळू चोरीबाबत प्रांताधिकारी यांना विचारले असता मी सुट्टीवर असल्याचे सांगत तहसीलदारांकडे बोट दाखवले. तहसीलदारांना वाळूचोरांवर कारवाई का होत नाही ? अशी विचारणा केली असता कारवाई सुरूच असल्याचे सांगत वाळूच्या ठिय्यांचे लोकेशन मागितले. स्वतःच्या पदरी एवढे कर्मचारी, भरारी पथके असताना तहसीलदार नागरिकांना वाळूच्या ठिय्यांचे लोकेशन मागतात हे हास्यास्पद आहे. “मी नाही त्यातली कडी लावा आतली”, या म्हणीप्रमाणे काही निर्ढावलेले अधिकारी तालुक्यात येऊन स्वतःच्या तुंबड्या भरत असल्याचे चित्र विदारक आहे. या अधिकाऱ्यांना पुढाऱ्यांचे अभय मिळाल्याने ते निर्धास्त आहेत. वाळू चोरांना या भ्रष्ट कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्याने हे वाळू चोर मस्तावले आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे. अनेक अधिकारी, कर्मचारीच वाळू चोरांना सामील असल्याचा आरोप होत आहे. जोपर्यंत झारीतले शुक्राचार्य शोधले जाणार नाहीत, तोपर्यंत नद्यांचे वस्त्रहरण सुरूच राहणार हे स्पष्टच आहे.




