
तहसीलदारांसह पथकाने केलेल्या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत…
अमळनेर:- अखेर अमळनेर येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार व त्यांच्या पथकाने बऱ्याच काळानंतर वाळू माफियांवर कारवाईचा श्रीगणेशा केला असून तब्बल एक ट्रॅक्टर पकडत धाडसी कामगिरी केली आहे. या धडक कारवाईची चर्चा पूर्ण तालुकाभर रंगली आहे.

काल बिलखेडा येथे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे तसेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनधिकृत गौण खनिज वाळू वाहतूक करणारे एक ट्रैक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर ट्रॅक्टर मुद्देमालासह अमळनेर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. या पथकात तहसीलदार व नऊ तलाठ्यांचा समावेश होता. या कारवाई बाबत माहिती देताना ट्रॅक्टर चालक व मालकाची माहिती माध्यमांना दिली नसली तरी सर्व पथकाने रात्रभर जागरण करून कारवाई केल्याबद्दल तहसीलदारांचे व पथकाच्या निरपेक्ष कारवाईचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.
चार पकडले, तीन सोडले आणि एकालाच आणल्याची अफवा…
महसूल विभागाने केलेल्या कारवाईचे कौतुक न करता आल्याने काहींनी तालुकाभर विविध अफवा पसरवणे सुरू केले असून दादू, बाळू आणि सोनूकडे मंथली पास असल्याने त्यांची पकडलेली तीन वाहने सोडल्याची खोटी अफवा पसरवण्यात आली आहे. रात्रभर वाळू वाहणाऱ्या शेकडो वाहनांमधून एक ट्रॅक्टर पकडून धाडसी कामगिरी करणाऱ्या पथकाचे कौतुक करणे अपेक्षित असताना विविध अफवा पसरवण्यात काही असंतुष्ट लोक धन्यता मानत आहेत. महसुलाच्या पथकाने याकडे लक्ष न देणे आपली कारवाईची गती अशीच कायम ठेवावी अशी मागणी मंथली पास वाटलेल्या मान्यवरांनी केली आहे.





