
अमळनेर:- तालुक्यातील प्र. डांगरी येथील ६७ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारी झाल्याच्या तणावातून विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २२ रोजी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्र. डांगरी येथील अल्पभूधारक शेतकरी विनोद रामराव शिसोदे (वय ६७) हे २२ रोजी दुपारी ३ वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेले. त्यांचा मुलगा राहुल व पुतण्या राकेश शिसोदे यांनी त्यांचा शोध घेतला असता ते मारवड रस्त्याकडे गेल्याची माहिती मिळाली. मारवड रस्त्यालगत शेतांमध्ये शोध घेतला असता ते गावातील पुष्पाबाई शिसोदे यांच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. व त्यांच्याजवळ विषारी औषधाची बाटली पडली होती. त्यांना उचलून खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील अगोने करीत आहेत. मयत विनोद शिसोदे यांच्याकडे फक्त दीड बिघे शेती असून त्यांच्यावर ८ लाख हातउसनवारीचे व सोसायटीचे ६० हजार असे ८.६० लाख रुपये कर्ज होते. या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी ही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.




