
१५ दिवसात कारवाई न झाल्यास मीनाक्षी चौधरी यांचा आंदोलनाचा इशारा…
अमळनेर : बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहनांचे अतिक्रमण झाले असून वाहनात क्षमतेपेक्षा जादा प्रवासी तसेच बेकायदेशीर रित्या घरगुती गॅस चा वापर केला जातो. या वाहनांवर १५ दिवसात कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मीनाक्षी दगडू चौधरी या महिलेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी , आर टी ओ आणि पोलीस अधीक्षकांना दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की बसस्थानक परिसरातून टॅक्सी किंवा प्रवासी वाहनांतून त्यांना ६ अधिक १ चा परवाना असताना ते १० ते १२ प्रवासी घेऊन जातात. यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. यात अनेकांना आपल्या शरीराचे अवयव गमवावे लागले आहेत. तसेच वाहनात सर्रास घरगुती गॅस चा वापर केला जातो. अनेक वाहनांची मुदत संपली असून काहींची कागदपत्रेच नाहीत. वाहनांचे ,कॅबिनचे अतिक्रमण बाबत अनेकदा पालिकेला तक्रार केली आहे. तरी देखील दखल घेतली जात नाही. या वाहनांवर ६६, १९२ कलमप्रमाणे तसेच घरगुती गॅस चा वापर केल्याबद्दल जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा मला खाजगी खटला दाखल करण्यास परवानगी द्यावी. तसेच १५ दिवसात कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील मीनाक्षी चौधरी यांनी दिला आहे.
दरम्यान एस टी आगाराच्या दोन्ही गेट मधून एस टी बस येण्याजाण्यास काही प्रवासी वाहने , रिक्षा यांचे अतिक्रमण नडते. ते आपली वाहने अजिबात हलवायला तयार नसतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन किरकोळ अपघात होत असतात. त्यामुळे धुळे चोपडा राज्यमार्गावरील अतिक्रमण ,हातगाड्या ,अवैध प्रवासी वाहने , रिक्षा यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग , पोलीस , नगरपालिका व महसूल प्रशासनने जनहिताचा विचार करून संयुक्त कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

