
पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे सखल भागात साचले पाणी…
अमळनेर:- येथील जुन्या वसाहतींमध्ये नवीन रस्ते तयार केले. परंतु नवीन रस्त्यांची उंची जुन्या रस्त्यांपेक्षा उंच असल्यामुळे पाण्याच्या निचरा होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुख्याधिकारी व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे असे प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण झाले आहेत.

धुळे रोड ते पिंपळे रोड जोडणारा विस्तारित रस्ता तयार करण्यात आला. पण या परिसरात जुनी लोकवस्ती असल्याकारणाने घरे रस्त्यापासून खूप उंच नाहीत. त्यामुळे सुरुवातीला तयार केलेले रस्ते व आता नवीन तयार झालेला जोड रस्ता यांच्या उंचीत फरक झाल्यामुळे सखल रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. रस्ता तयार करताना अनेक नागरिकांनी विनंती करून रस्त्याची उंची कमी करण्याची मागणी केली होती परंतु त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून आडमुठेपणाने हा रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. असेच पाणी विठ्ठल नगर येथे डी ए धनगर यांच्या घरासमोरील जुन्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना वापर करण्यासाठी अडचणीचा ठरत आहे. नवीन रस्ता तयार करताना या जुन्या रस्त्याचा पाण्याचा निचरा कसा होईल याची काळजी नगरपालिकेने न घेतल्यामुळे सदर समस्या निर्माण झालेली आहे. आता या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट पालिका कशी लावणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे? यापूर्वी देखील या परिसरामध्ये पाणी साचण्याची समस्या होती. अनेक प्रयत्न करून देखील नगरपालिकेला सोडवण्यात यश आले नव्हते. ही समस्या अशीच राहिली तर विठ्ठल नगर मधून जाण्यासाठी नागरिकांना प्रचंड मोठा त्रास होणार आहे. त्यामुळे सदर समस्येला गांभीर्याने पाहून सोडवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे असे परिसरातील नागरिकांची मागणी आहे. आगामी काळात खूप मोठा पाऊस झाला तर पाणी निघायला जागाच नाही. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करून सदर नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा परिसरातील नागरिक करीत आहेत.




