
रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल
अमळनेर : शहराच्या मारवड रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाच्या मध्यभागी, जो रेल्वेच्या अखत्यारीतील भाग आहे, सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते जीवघेणे ठरत आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी साचलेले पाणी आणि उघडे खड्डे प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत.

उड्डाणपुलाचा मध्यभाग हा रेल्वेच्या मालकीचा असून त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी रेल्वेच्या बांधकाम विभागावर आहे. मात्र, या विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. या पुलाच्या पलीकडे प्रताप कॉलेज असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींना याच रस्त्याने ये-जा करावी लागते. खड्ड्यांमधून वाट काढताना त्यांचा जीव मुठीत धरावा लागत आहे. वाहन चालकांना खड्ड्यांमुळे वाहने चुकवत चालवावी लागत असून यामुळे अपघाताची शक्यता प्रचंड वाढली आहे. चारचाकी, दुचाकी, ट्रक आदी वाहने मोठ्या प्रमाणात या पुलावरून वाहतूक करतात. मात्र, खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने ते अधिक धोकादायक ठरत आहेत. अनेक वाहनचालकांनी आणि स्थानिकांनी तक्रारी करूनही अद्याप रेल्वे बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही. या ठिकाणी तातडीने डागडुजी व योग्य पाणीनिचरा व्यवस्थेची गरज असून, प्रशासनाने आणि नागरिकांनी मिळून या गंभीर प्रश्नावर आवाज उठवणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा मोठा अपघात घडून गेल्यावरच उपाययोजना होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया…
हे काम बांधकाम विभागाचे आहे, परंतु ते दुर्लक्ष करत आहेत. आम्ही केवळ खालच्या रस्त्याच्या देखभालीसाठी जबाबदार आहोत. तरीही ही समस्या लक्षात घेऊन काहीतरी मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी डांबर टाकणे अत्यावश्यक आहे. – पंकज झाडीकर रेल्वे अधिकारी बांधकाम विभाग




