
सामाजिक संस्था करत असलेल्या प्रयत्नांवर निष्क्रीय अधिकाऱ्यांमुळे फेरले जातेय पाणी…
अमळनेर:- तालुक्यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वाळू उपश्याचे गंभीर परिणाम नजिकच्या काळात दिसून येणार असून तोवर ही खिसेभरु सरकारी बाबू दुसरीकडे तुंबड्या भरायला निघून जातील.

तालुक्यातील तापी, पांझरा, बोरी नदीसह छोट्या नदीनाल्यातून आतापर्यंत कधी न झालेला प्रचंड वाळू उपसा यंदा सुरू आहे. वाळूच्या पैशांनी तोंड दाबल्यामुळे कारवाईला कचरणारे इतके निगरगठ्ठ अधिकारी पहिल्यांदाच तालुक्याने पाहिले असून हे अधिकारी तर तुंबडी भरून निघून जातील मात्र आधीच अवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागल्यास नवल वाटणार नाही. एकीकडे तालुक्यातील सामाजिक संस्था व चळवळी नदी नाल्यातील गाळ काढून भूगर्भजल पातळी वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तालुक्यातील जीवनदायिनी असलेल्या तिन्ही नद्यातील वाळू उपाश्यामुळे भूगर्भजलात मोठी घट येणार आहे. जेव्हा अवैध वाळू उपसा होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम भूगर्भजलावर होतो. नदीत आणि नदीकिनाऱ्यावर असलेली वाळू पावसाचे पाणी जमिनीच्या आत झिरपवते. वाळू उपसामुळे जमिनीत पाणी झिरपत नाही, परिणामी भूगर्भजल कमी होते. ग्रामीण भागात पिण्याचे व सिंचनाचे पाणी विहिरींवर अवलंबून असते. वाळूचोरीमुळे त्या कोरड्या पडतात. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांना हे खिसेभरु अधिकारी कारणीभूत असून त्यांच्या आशीर्वादाने निर्भयपणे सुरू असलेली वाळू वाहतूक भविष्यातील दुष्काळाला आमंत्रण देणार आहे.




