
साने गुरुजी विद्यालयात राबवला उपक्रम
अमळनेर:- येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक , परिमेय व अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी मैदानाचा उपयोग करून संकल्पना समजावून देण्यात आली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील,सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने गणित शिक्षक डी ए धनगर यांनी अभिनव उपक्रम राबवला.

दैनंदिन अध्ययन अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना संख्या ओळखताना अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवताना सुद्धा बरेच विद्यार्थी चुका करतात. त्यांचे कायमस्वरूपी लक्षात राहावे यासाठी कृतीयुक्त पद्धतीने संकल्पना शिकवण्यात आली. त्यासाठी मैदानावर संख्या रेषा काढून त्यावर विद्यार्थ्यांना मुखवटा घालून ओळख देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मुखवटावर विशिष्ट अंक लिहिण्यात आला. संख्यारेषेवर त्या अंकाची जागा जिथे असेल त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला उभे करण्यात आले. जेव्हा परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायची वेळ येते त्यावेळी विद्यार्थी गोंधळतात किंबहुना त्यांना त्या संख्येची योग्य जागा ठरवता येत नाही. परिणामी परीक्षेत विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात. ही संकल्पना कायम लक्षात राहावी यासाठी प्रत्यक्ष मैदानावर नेऊन इतर विद्यार्थ्यांचा समक्ष संकल्पना देण्याचा प्रयत्न, संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने गणित शिक्षक धनगर यांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजले की एक एक अंतराचे समान दोन भाग कसे होतात. एक एकक अंतराचे समान तीन भाग, चार भाग, पाच भाग कशा पद्धतीने करता येतात व त्यांची संख्या रेषेवरची निश्चित जागा कोणती असते व त्यांची निश्चित किंमत काय असते. हे समजायला मदत झाली. त्यासाठी आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त सहभाग घेतला. या कृतीयुक्त सहभागामुळे विद्यार्थ्यांना सदर संकल्पना दीर्घकाळ स्मरणात राहील. विद्यार्थ्यांना गणिताविषयी असलेला न्यूनगंड दूर सारून, आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण होईल.
सदरचा उपक्रम राबवत असताना मुलांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद बघायला मिळाला. तसेच संकल्पना समजल्याचे समाधान सुद्धा बघायला मिळाले. खरोखर गणित एवढे सोपे असते व ते मैदानावर कृतीयुक्त पद्धतीने दाखवता येऊ शकते याची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांनी घेतली. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व गणित शिकवणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी समाधान व्यक्त केले. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक जयेश मासरे, आर एस पाटील, मुस्ताक शेख व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. सदरच्या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक , पालक यांनी गणित शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले




