
अमळनेर:- तालुक्यात वाळू चोरांना अधिकाऱ्यांनी खुली सूट दिली असताना माझा काहीही संबंध नसून माझ्यावर विनाकारण आरोप होत असल्याचे तहसीलदार सांगत आहेत. त्यामुळे वाळूचोरांवर धडक कारवाई करून तहसीलदारांनी स्वतःवरील आरोपांचा डाग धुवून काढावा असे आवाहन सुजाण नागरिकांनी केले आहे.

तालुक्यात सुरू असलेल्या अमर्याद वाळू उपश्यावरुन दररोज बातम्यांच्या माध्यमातून अनेकांवर आरोपांच्या फैरी झडत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय असे प्रकार बिनबोभाटपणे चालणार नाहीत हे समजायला जनता दुधखुळी नाही. मांजर डोळे मिटून दूध पित असली तरी सर्वांना ते दिसतेच आहे. त्यावरून एका अमळनेरकराने तहसीलदारांना खडे बोल सुनावल्याने तहसीलदारांनी माझा एक रुपयाचा ही आर्थिक संबंध नसल्याचे सांगत मला मुद्दाम लक्ष्य केले जात असल्याचा सूर आवळला आहे. मात्र तहसीलदार साहेब आपला कोणताही संबंध नसेल तर तीनही नदीतून अमर्याद वाळू चोरणाऱ्या वाळूचोरांवर कारवाई का होत नाही ? का माहिती येऊन ही परस्पर पकडलेले ट्रॅकर, डंपर सोडले जातात ? तलाठ्यांवर कश्यामुळे खुले आम नाव घेऊन आरोप करण्यात येतात ? या प्रश्नांची उत्तरे तहसीलदारांनी द्यावीत. तसेच आपला काही संबंध नसेल तर आपण वाळू चोरांवर कारवाई करून तुमच्यावर असलेल्या बदनामीचा डाग धुवून काढावा असे आवाहन करण्यात येत आहे.




