
डमी ग्राहक पाठवून युरियाची मागणी केली असता शेतकऱ्यांची लूट होत असल्याची झाली खात्री…
अमळनेर:- तालुक्यातील ११ कृषी केंद्रांवर जिल्ह्याच्या तक्रार निवारण केंद्राच्या भरारी पथकाने रविवारी भेटी देत तपासणी केली. यावेळी कृषी केंद्रांमध्ये मोठी अनियमितत्ता आढळून आल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी नमूद केले असून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे ही निदर्शनास आले.

तालुक्यात युरिया खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत असल्याबाबत व अधिकचे पैसे घेऊन लुटी सुरू असल्याचे अमळनेर २४×७ ने उघडकीस आणल्यानंतर २९ जून रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा स्तरावरून बियाणे, खते, कीटकनाशके तक्रार निवारण कक्षाने भेट देत अमळनेर शहरात दहा व पातोंडा येथील एका कृषी केंद्रांवर डमी ग्राहक पाठवले. मात्र या डमी ग्राहकाला युरिया उपलब्ध नसल्याचे सांगत परत पाठवून देण्यात आले. त्यानंतर पथक प्रमुख व जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी या कृषी केंद्रावर भेट दिली. या कृषी केंद्रांवर युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले असून केवळ अधिकचे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण फिरवत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याने या कृषी केंद्र चालकांची कानउघडणी करण्यात आली असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या लुटीबाबत तालुका कृषी कार्यालयाला देणेघेणे नाही…
जिल्हा स्तरावरून अधिकारी सुट्टीच्या दिवशी येऊन तपासणी करत आहेत मात्र तालुक्यात असलेले तालुका कृषी अधिकारी कार्यालय मात्र वेळकाढूपणा करत असून त्यांचा किस गली में गलबला असा प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. निरीक्षक म्हणून शेतकऱ्याची लूट होत असताना कारवाई करण्याचा अधिकार असूनही केवळ प्रशिक्षण दिले नसल्याचे सांगत तालुका कृषी अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत.
बहुसंख्य शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे झाले उघड…

युरिया खरेदी बाबत अधिकचे पैसे घेतले जात असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कच्च्या पावत्या देत आमचीही लूट झाल्याचे सांगितले. कृषी केंद्र चालकांनी भाव फलक व साठा फलक लावणे आवश्यक असताना अनेक कृषी केंद्रावर हे फलक मुद्दाम लावण्यात येत नाही. असे प्रकार आढळून आल्यास तक्रार निवारण केंद्राच्या तक्रार क्रमांकावर फोटो पाठवून तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
प्रतिक्रिया…
तालुक्यात मुबलक प्रमाणात खत पुरवठा करण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांनी खत खरेदीस जाताना स्वतःचे आधारकार्ड सोबत घेऊन जावे. युरीया खताची अधिकृत किंमत २६६.५० रु असून कोणत्याही विक्रेत्याने वाढीव किंमतीने युरीया खत विक्री करत असल्याचे आढळल्यास जिल्हा स्तरीय तक्रार निवारण कक्षाचा मोबाईल नंबर -9307076107 यावर संपर्क करुन तक्रार करावी. शेतकऱ्याचे नाव पुर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. – श्री पद्मनाभ म्हस्के, जिल्हा कृषी विकास अधिकारी




