
तहसीलदार नीता लबडे यांनी २ किमी पायी जात अवैध गौण खनिज वाहणारी ८ वाहने केली जप्त…
अमळनेर:- जिल्ह्यातील भुसावळ येथील तहसीलदार नीता लबडे यांनी धाडसी कारवाई करून जिल्ह्यातील इतर तहसीलदारांना अनुकरणीय आदर्श ठेवला आहे. अमळनेरच्या अधिकाऱ्यांनी देखील आदर्श घेऊन कारवाई करण्याची हिंमत दाखवण्याची गरज आहे.

भुसावळ,जळगाव सीमेवरील नदीकाठच्या जंगलात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक थांबवण्यासाठी तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांनी स्वतः पुढाकार घेत, आपल्या पथकासह २ किमी जंगलात पायी जाऊन केलेल्या धाडसी कारवाईने सर्वांनाच प्रेरणा दिली आहे. या कारवाईत १ जेसीबी व ७ डंपर जमा करण्यात आले आहे. ही धाडसी कारवाई इतरांसाठी अनुकरणीय असून अमळनेरच्या अधिकाऱ्यांनी देखील त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. गुपचूप माफियांना निरोप पाठवून उपसा बंद करण्याच्या सूचना देण्यापेक्षा धडक कारवाई करून जनतेला संदेश देणे गरजेचे आहे.
तालुक्यात खुलेआम वाळू वाहतूक सुरू असून तहसीलदार माझा संबंध नसून ज्यांचा संबंध आहे त्यांना लक्ष्य करा असे सांगत जबाबदारी पासून पळ काढत आहेत. भुसावळच्या महिला तहसीलदार अशी धाडसी कारवाई करू शकतात तर अमळनेरचे अधिकारी कश्यामुळे घाबरत आहेत ? अधिकाऱ्यांनी कितीही नाकारले तरी कोणाचे आर्थिक संबंध आहेत हे आता तालुक्यातील जनतेच्या ही लक्षात आले आहे.




