
अमळनेर:- तालुक्यातील हेडावे येथून रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या पोकलेन मशीनमधून शंभर लिटर डिझेल चोरी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर. बी.कन्स्ट्रक्शनकडून धरणगाव ते अमळनेर रस्त्याचे काम सुरू असून त्यांची मशिनरी हेडावे शिवारातील विजय पाटील यांच्या शेताजवळ उभी असतात. १५ रोजी रात्री ८:३० वाजता कन्स्ट्रक्शन चे सुनील शाळिग्राम पाटील, विजय पाटील, संजय शिंदे, निलेश पाटील हे मशिनरी लावलेल्या ठिकाणी गेले असता ऑपरेटर रकतुकुमार मंगलसिंग (रा. चिरिया जिल्हा चंपारण रा. बिहार ) हा व ड्रायव्हर राजकुमार भास्कर शिवदे (रा. आर के नगर, अमळनेर) हे दोघे ३५ लिटर मापाचा कॅन घेऊन दुचाकीवर जाताना दिसले. फिर्यादी व इतर लोकांनी त्यांना हटकले असता ते कॅन सोडून पळू लागले. त्यामुळे त्यांना पकडून आणले असता त्यांनी पोकलेन मशीन मधून डिझेल काढल्याचे कबूल केले. त्यांनी पोकलेन मशीनची टाकी चेक केली असता १०० लिटर डिझेल गायब असल्याचे दिसून आले. त्यावरून सुनील पाटील यांनी अमळनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत

