
पाचपैकी तिघे पळाले, दोघांना ग्रामस्थांनी पकडले, गुप्त धनाची लालसा असल्याचा संशय…
अमळनेर : तालुक्यातील खेडी व्यवहारदळे शिवारात ६० ते ७० वर्षांपूर्वीची हनुमानाची मूर्ती काहीनी खोदून काढल्याची घटना १५ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
महेंद्र सुरेश पाटील यांचे व्यवहारदळे शिवारात शेत असून १५ रोजी सायंकाळी ७ वाजता ते मोटरसायकलने शेतात जात असताना त्यांना वनक्षेत्रात असलेले रामेश्वर ,जुनोने , टाकरखेडा , व्यवहारदळे ,ढेकू खुर्द या गावांचे जागृत देवस्थान असलेले मारुती ची दोन फूट उंचीची मूर्ती पाच इसम खोदकाम करत असल्याचे आढळून आले. महेंद्र त्यांच्याकडे जात असताना त्यापैकी तीन जण तेथून कुदळ फावडा घेऊन पळून गेले. मूर्ती सुमारे दोन फूट खोदून काढली होती. उर्वरित दोघांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी प्रदीप राजेंद्र बडगुजर रा शिरूडनाका , संदीप उर्फ बाळू सुमितलाल कोठारी रा मुठे गल्ली अशी सांगितली. आणि पळून गेलेल्या तिघांची नावे आसिफ छोटू बागवान , जहुर पठाण आणि इकबाल शेख अशी सांगितली. महेंद्र याने गावच्या पोलीस पाटील आणि ग्रामस्थांना बोलावून घेतले. त्यावेळी मूर्तीच्या आजुबाजूला लिंबू ठेवल्याचे ही आढळून आले. एकूण हा प्रकार गुप्तधनाच्या लालसेपोटी केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. हा मारुती जागृत असल्याने पाचही जणांविरुद्ध मूर्तीच्या पावित्र्य भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाययक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत. १६ रोजी परिसरातील ग्रामस्थांनी ब्राह्मणाला बोलवून मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करून घेतली.

