
बंद पडलेले अनुदान मिळण्यास मार्ग मोकळा झाल्याने निराधार वृद्धेला मिळाला दिलासा…
अमळनेर : तालुक्यातील १०० वर्षे वयावरील मतदारांच्या भेटीत उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी मौजे पिंपळी प्र जळोद येथील मुले नसलेल्या दगुबाई सावंत वय (१०१) यांचे चार महिन्यांपासून अनुदान बंद असल्याने कर्मचार्यांना घरी जाऊन ईकेवायसी करण्याचे आदेश देऊन तातडीने करायला लावले.
अमळनेर तालुक्यात बीएलओंच्या अहवालानुसार ५२ मतदार १०० पेक्षा जास्त वयाचे दिसत होते. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी १०० वयावरील मतदारांची तपासणी सुरू केली. त्यात २३ मतदार मयत आढळले. ३ मतदार स्थलांतरित आढळले. तर १९ मतदार १०० वयापेक्षा कमी आढळून आले. फक्त सात मतदार १०० पेक्षा अधिक वयाचे आढळले. त्यापैकी एक मतदार मुलीकडे गेलेले आहेत. उर्वरित सहा मतदारांपैकी ५ मतदारांच्या उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी गृहभेट घेतली.मतदार यादीतील त्यांचे तपशिलाबाबत खात्री केली. यावेळी पिंपळी प्र ज येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किरण पाटील व निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके हे उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. पिंपळी प्र जळोद येथील दगुबाई यांचे अनुदान बंद असल्याची तक्रार तिने मुंडावरे यांच्याकडे केली. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तेथूनच तिच्या घरी जाऊन ई केवायसी करण्याचे आदेश दिले.
प्रांताधिकाऱ्यांचे आदेश मिळताच महसुलचे पथक मौजे पिंपळी येथे पोहचले. दगुबाई सावंत यांचे (इंगायो) ऑनलाईन एन.एस.ए.पी. प्रणालीद्वारे रजिस्ट्रेशन करून तात्काळ हयातीचा दाखला करण्यात आला. पथकात आर.आर.ढोले (संगायो नायब तहसीलदार) , जगदीश पाटील (महसूल सहाय्यक) योगेश बाळदे(ऑपरेटर ) ,योगेश कोळी (युवा प्रशिक्षनार्थी ) यांचा समावेश होता. दगुबाई हिला मुलगा ,पती कोणीच नसल्याने ती एकटी राहते. तिला चालताही येत नाही. तिचा पुतण्या तिची देखभाल करतो. हयातीचा दाखला मिळाल्याने तिला अनुदान मिळाल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




