
शिवभक्तांच्या गर्दीने वेधले साऱ्यांचे लक्ष
अमळनेर-श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे श्रावण मासानिमित्त काल शुक्रवार दिनांक 23 रोजी जळोद ते वर्णेश्वर महादेव मंदिरापर्यंत इच्छापूर्ती कावड यात्रा उत्साहात पार पडली.यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाल्याने या यात्रेकडे साऱ्यांचे लक्ष वेधले गेले होते.
मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांच्यासह असंख्य शिवभक्त जळोद येथे सकाळी 10 वाजता पोहोचल्यानंतर तापी माईची विधिवत पूजा करण्यात आली यानंतर प्रत्येकाने कावड मध्ये पाणी घेतल्यावर महादेवाचा जयघोष करीत जल्लोषात कावड यात्रेला सुरुवात झाली.यात महिलांची संख्याही लक्षणीय होती.शिव गीतांवर वाजत गाजत यात्रा अमळगाव रस्त्यावर आल्यानंतर निवृत्त मेजर सुविदास सुभेदार यांच्यासह परिवाराने स्वागत करत सर्वाना पोह्यांचा अल्पोपहार दिला.यानंतर अमळगाव येथे कॉन्ट्रॅक्टर श्रीराम चौधरी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते याचाही लाभ शिवभक्तांनी घेतला.वाटेत प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांनी काढलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधत होत्या.यात्रे दरम्यान माजी आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष सौ जयश्री अनिल पाटील,अर्बन बँक व खा शी मंडळाचे संचालक मंडळ,माजी नगरसेवक,पत्रकार बांधव यासह राजकीय,सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरानी भेटी दिल्या.वाटेत वरून राजाचे आगमन झाल्याने सर्वानी आनंद व्यक्त केला.
गांधली येथेही ग्रामस्थांतर्फे स्वागत व चहा पाणी करण्यात आले.कावड यात्रा सायंकाळी अमळनेर येथे वर्णेश्वर मंदिरात पोहोचल्यावर विधिवत पद्धतीने महादेवाचा जलाभिषेक करण्यात आला.
दरम्यान श्रावण महिना सुरु झाल्याने अतिप्राचीन व जागृत देवस्थान असलेल्या श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान येथे महिनाभर यात्रा भरणार आहे.सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान तर्फे आभार मानण्यात आले.यासाठी सिध्देश्वर महादेव मंदिर संस्थान, सानेनगर,ओम श्री महादेव मंदिर, हेडावे,ओंकारेश्वर महादेव मंदिर, फरशी रोड, अमळनेर,हरेश्वर महादेव मंदिर,रढावण-राजोरे,ओंकारेश्वर महादेव मंदिर, जुने महादेव मंदिर, अमळगांव,श्री नंदेश्वर महादेव मंदिर, पैलाड,श्रीराम संस्थान, नंदगांव,पुष्कर महादेव मंदिर, निरंजन महादेव मंदिर, गांधली,नागेश्वर महादेव मंदिर, जळोद आदींचे सहकार्य लाभले.




