
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून यंदा सुरुवातीपासूनच पाठपुरावा…
अमळनेर : तालुक्यात स्वतंत्र कापूस खरेदी केंद्र (सीसीआय) सुरू करण्यात यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक पाटील यांच्यासह सचिव डॉ उन्मेष राठोड यांनी संभाजीनगरचे भारतीय कापूस निगम चे उपमहाप्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांनी देखील अमळनेर तालुक्याला सीसीआय केंद्र द्यावे अशी शिफारस केली आहे. गेल्या वर्षी अमळनेर तालुक्याला सीसीआय केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस कमी भावात व्यापाऱ्यांना विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपला माल बाहेर तालुक्यातील केंद्रांवर नेला त्यांना वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. अमळनेर तालुक्याला सीसीआय केंद्र सुरू करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या मालाला वाजवी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. बाजार समितीने सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून मनुष्य बळ देखील पुरवण्यात येणार असल्याचे सचिव डॉ राठोड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
कापूस खरेदी कोठे करावी हा प्रश्न उद्भवू नये म्हणून लामा जीन मालक आणि लक्ष्मी कॉटन जीन मालक यांचे सर्व सुविधा आणि क्षमता असल्याचे हमी पत्र घेऊन ते उपमहाप्रबंधक यांच्याकडे सादर केले आहे.
गेल्या वर्षी अनेकदा मागणी करूनही आणि कापूस निगम च्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केल्यावर अमळनेर तालुक्यात कापसाची प्रतवारी चांगली नाही असे कारण दर्शवून सीसीआय केंद्र नाकारण्यात आले होते. पाठपुरावा करायला देखील उशीर झाला होता. मात्र यंदा सुरुवातीलाच मागणी करण्यात आली असल्याने यंदा सीसीआय केंद्र मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.




