
मुंदडा नगर भागात दूषित पाणी पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
अमळनेर:- शहरातील मुंदडा नगर एक भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मुंदडा नगर एक मधील पाण्याच्या टाकीवरून या परिसरात पाणी पुरवठा होतो. मागील चार महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. आता पावसाळ्यात दुर्गंधीयुक्त व हिरवेगार पाणी पुरवठा होत आहे. पाणी पिण्यायोग्य नसल्याने साथीचे आजाराचे प्रमाण वाढू शकते. पाण्याच्या टाकी परिसरात वारंवार पाईप लाईन खोदकाम होत आहे. परिणामी पावसाळ्याचे साचलेले पाणी पाईप लाईन मध्ये गेल्याने पाणी दुर्गंधी येत आहे. याबाबत बऱ्याचदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे या परिसरातील नागरिकांनी तक्रारी करूनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. नळाला आलेले दुर्गधी व हिरवेगार पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत काहीही दुष्परिणाम झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असे सांगत संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.




