
कृषी केंद्रांची मनमानी न थांबल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा इशारा…
अमळनेर:- अनेकदा आवाज उठवून ही तालुक्यात वाढीव दराने युरियाची विक्री करून शेतकऱ्यांची लूट सुरूच असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे रवींद्र पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत रवींद्र पाटील यांनी तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभागात निवेदन व पुरावे सादर केले आहेत. साईकृष्णा फर्टिलायझर या कृषी केंद्राकडून युरियासाठी रवींद्र पाटील यांच्याकडून ३०० प्रति बॅग या वाढीव दराने पैसे घेण्यात आले. त्यांनी घेतलेल्या बिलाची पावती, कच्च्या बिलाची पावती आणि ऑनलाइन पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट असे पुरावे जोडले आहेत. सदर निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, खते असूनही नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांना लेखी तक्रार देऊन ही ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष करतात व मनमानी कारभार करणाऱ्या काही कृषी केंद्र चालकांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच ही लूट त्वरित थांबवून या कृषी केंद्र चालकावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू…
जिल्ह्यात कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्याकडून जिल्हाभरात वाढीव दराने कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई सुरू असून अमळनेर तालुक्यातील सहा, भडगाव येथील दोन, जळगाव तालुक्यातील दोन, चाळीसगाव तालुक्यातील दोन, व जामनेर तालुक्यातील तीन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर चाळीसगाव तालुक्यातील एका कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.




