
अमळनेर : अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशाने मतदान यादी तयार करणे सुरू झाले आहे.
अमळनेर शेतकी संघात १६ हजार ३३२ सर्वसाधारण मतदार आहेत. तर १५५ संस्था मतदार आहेत. संस्थांचे ठराव १३ ऑगस्ट पर्यंत मागवण्यात आले आहेत त्यांनंतर प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
अमळनेर शेतकी संघाला निवडणुकीसाठी सुमारे १६ लाख रुपये निवडणूक प्राधिकरण कडे भरावे लागणार आहेत. त्यापैकी १० लाख रुपये संघाने भरलेले आहेत. अमळनेर शेतकी संघाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने संघ निवडणुकीचे पैसे भरू न शकल्याने निवडणूक होऊ शकलेली नाही. त्यामुळे आठ वर्षांपासून शेतकी संघावर प्रशासक आहे. शासनाच्या भरड धान्य खरेदी ,रब्बी , खरीप हंगामातील खरेदीतून मिळणारे कमिशन हेच उत्पन्न आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून धान्य खरेदी अमळनेर शेतकी संघाला न देता ती एरंडोल मतदार संघाला दिली जात असल्याने शेतकी संघाच्या उत्पन्नाला खोडा बसला आहे.
शेतकी संघात फक्त ४ कर्मचारी असून संघाचे गोदाम भाड्याने दिलेले असल्याने त्या भाड्याच्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत. निवडणुकीसाठी संघाला आणखी ५ लाख रुपये भरावे लागणार आहेत. जर कोणी अनामत भरली तर निवडणुकीचा निधी प्राप्त होऊ शकतो.
राजकीय नेत्यांना आपले कार्यकर्ते सांभाळण्यासाठी शेतकी संघ ही एक प्रमुख संस्था आहे. काही वर्षांपूर्वी ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार ज्या सभासदांचे भाग भांडवल १०० रुपये असेल त्यालाच मतदार म्हणून ग्राह्य धरण्यात येणार होते. अनेक सभासदांचे ५० रुपये भांडवल होते. म्हणून सुमारे ८ हजार ३२५ सभासद कमी झाले होते. त्या निर्णयाला माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील यांनी आव्हान दिल्याने वगळलेले सभासद पुन्हा मतदार झाले होते.




