
अमळनेर : शहरातील बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या गांधीनगर अतिक्रमण बाबत न्यायालयाने स्थगिती दिलेली असल्याने मलिदा आणि विटा मातीचा ढिगारा रस्त्यातच पडून आहे.
अमळनेर नगरपालिकेतर्फे गांधीनगर भागातील सुमारे ४० अतिक्रमित घरे काढण्यात आली होती. दुपारपर्यंत घरे जमीनदोस्त करण्यात आली होती. मात्र त्यांनंतर न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे पालिकेला रस्त्यावरील विटा मातीचा ढिगारा , तुटलेले साहित्य उचलता आले नाही.
अतिक्रमण धारकांपैकी काहींची स्वतःची घरे असल्यामुळे ते लोक स्वतःच्या घरात राहायला गेले आहेत. तर दोन तीन जणांना पालिकेने म्हाडा मध्ये घरकुल देऊन स्थलांतरित केले आहे. आता फक्त तीन जण त्याठिकाणी राहिले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र जे दोन तीन कुटुंब भर पावसात आजही तसेच तेथे राहत आहेत. त्यांचे अत्यंत हाल होत आहेत. न्यायालयाच्या स्थगितीमुळे त्यांना डोक्यावर छत देखील उभारता येत नाही.
अतिक्रमण धारकांना आजही पालिका म्हाडा कॉलनीत अधिकृत रित्या स्थलांतरीत करायला तयार आहे. आणि न्यायालयाची स्थगिती उठल्या नंतर रस्त्याचे काम त्वरित करण्यात येईल.- तुषार नेरकर , मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद




