
अमळनेर : तालुक्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाचे स्वस्त व मोफत धान्य लाभार्थी संख्या २ लाख १४ हजार ६३३ आहे. त्यापैकी ५७ हजार ३४४ लाभार्थ्यांचे ई केवायसी अद्याप बाकी आहेत.
शासनातर्फे गरजू ,गरीब , आर्थिक दुर्बल घटकांना जीवन जगण्यासाठी मोफत व स्वस्त धान्य वाटप दर महिन्याला केले जाते. पारदर्शकपणा आणण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांचे आधार आणि मोबाईल नंबर लिंक केले असल्याने आणि पॉस मशीनला अंगठा दिल्याशिवाय धान्य वितरीत होत नाही.
अनेक लाभार्थ्यांनी मोबाईल आणि आधार लिंक केलेले नसल्याने केवायसी झालेले नाही. त्यामुळे ते लाभापासून वंचित राहू शकतात. शासनाने अनेकदा केवायसी करण्याची मुदत वाढवल्यांनंतर देखील लाभार्थी केवायसी करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकदा वृद्ध नागरिकांच्या हाताचे ठसे घेतले जात नसल्याने त्यांचे केवायसी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे वृद्ध निराधार यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अमळनेर तालुक्यात अंत्योदय चे रेशन कार्ड ८ हजार ७६४ असून लाभार्थी ३५ हजार २७१ आहेत. प्राधान्य कुटुंबाचे रेशन कार्ड ४३ हजार ५६४ आहेत. तर लाभार्थी म्हणजे युनिट संख्या १ लाख ७९ हजार ३६२ आहे. एकूण लाभार्थी कार्ड संख्या ५२ हजार ३२८ तर एकूण लाभार्थी २ लाख १४ हजार ६३३ आहे. पैकी ५७ हजार ३४४ लाभार्थ्यांचे केवायसी झाले नाही.
ज्या नागरिकांचे अंगठे उमटत नाहीत त्यांचे केवायसी होऊ शकत नाहीत. ते घरबसल्या मेरा ई केवायसी ऍप वरून चेहऱ्याने किंवा मोबाईल वर ओटीपी मागवून केवायसी करू शकतात. – रुकसाना शेख , पुरवठा निरीक्षण अधिकारी ,अमळनेर




