
अमळनेर : श्रावण मास सुरू झाला अन महादेवाच्या भक्तांची भक्ती स्फूरून येते. पुण्याच्या एका तरुणाने भर पावसात पुणे ते केदारनाथ असा सायकल प्रवासाला निघाला आहे.
किशोर रामराव एकणार (वय २५ रा चिंचखेड ता बार्शी टाकळी जिल्हा अकोला) हा तरुण पुण्यात हॉटेल व्यवसाय करतो. सहा महिन्यांपूर्वी त्याची १२ ज्योतिर्लिंग करायची इच्छा झाली. २१ जुलै रोजी पुण्याहून सायकल प्रवासाला सुरुवात केली. एक योगा मॅट , कापडी तंबू , दोन चादरी , दोन ड्रेस एव्हढेच साहित्य घेऊन किशोर देहू , भीमाशंकर , त्र्यंबकेश्वर , सप्तशृंगी गडावर दर्शन घेऊन २९ जुलैला सायंकाळी अमळनेर पोहचला.
भर पावसात भिजत किशोर दररोज आठ ते नऊ तास ७० ते ८० किमी प्रवास करतो. रस्त्यात कुठे तरी मंदिर अथवा देवस्थानात आपला मुक्काम करतो. अमळनेर येथे आल्यावर त्याने मंगळदेवग्रह मंदिरात मुक्काम केला. तेथे त्याची राहण्याची ,खाण्याची सोय करण्यात आली.
अमळनेरहून तो ममलेश्वर , ओंकारेश्वर तेथून उज्जैन याठिकाणी दर्शन घेऊन दिल्ली मार्गे बद्रीनाथ आणि केदारनाथाचे दर्शन घेणार आहे. केदारानाथाचे मंदिर बंद होण्यापूर्वी किशोरला तेथे पोहचायचे असल्याने तो ऊन वारा ,पाऊस याचा विचार न करता आपला प्रवास न थांबता सुरूच ठेवतो.

