
अमळनेर : गुजरात राज्यातील दहा ते बारा गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या तालुक्यातील पातोंडा येथील सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलिसांनी पकडून गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील मनोज शिवाजी पाटील वय ३४ याच्यावर गुजरात व बिललीमोरा येथे खून , खुनाचा प्रयत्न आदी प्रकारचे दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत. गुजरात पोलिसांना तो अनेक दिवसांपासून चकवा देत होता. त्याचे लोकेशन काढून देखील आरोपी त्या जागेवर सापडत नव्हता. अखेरीस गुजरात पोलिसांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना आरोपी पकडून देण्याची विनंती केली. निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , हेडकॉन्स्टेबल विजय भोई , राहुल पाटील आणि प्रशांत पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्यासाठी पातोंडा येथे पाठवले. आरोपीची दहशत असल्याने त्याचे घर कोणी दाखवायला तयार नव्हते. अखेरीस एकाने लांबून त्याचे घर दाखवल्यावर पोलीस त्याच्या घराजवळ पोहचताच आरोपीला पोलीस आल्याची माहिती मिळताच त्याने घराच्या मागच्या दाराने पळ काढला. पोलिसही त्याच्यामागे धावले. पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करून आरोपीला पकडले आणि गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले.




