
अमळनेर : माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड येथील बंगल्यात अज्ञात चोरट्यानी कुलूप तोडून घरातील २४ लाख रुपयांचे ७०० ग्रॅम सोने व १० लाख रुपये रोकड चोरून नेल्याची घटना २ रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास घडली.
माजी आमदार साहेबराव पाटील गेल्या २७ जुलै पासून कुटुंबासह आपल्या मुलाकडे नाशिक येथे गेलेले होते. सकाळी घरामागील अरुण पाटील यांनी माजी आमदार पाटील यांच्या नातूला कळवले की, घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांच्या नातेवाईकांनी प्राथमिक पाहणी केली असता त्यांना घराच्या सर्व दरवाजाचे कुलूप तोडलेले तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यांनी साहेबराव पाटलांशी संपर्क साधला. त्यांनी डीवायएसपी विनायक कोते, पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप याना कळवले.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास माजी आमदार साहेबराव पाटील राजवड पोहचले. चोरट्यानी घरातील कपाट आणि बेड उचकावून साहित्य अस्ताव्यस्त केलेले दिसले. चोरट्यानी घरातील ९ लाख रुपये किमतीच्या ३०० ग्रॅम सोन्याच्या मंगल पोत , ७ लाख रुपये किमतीच्या २०० ग्रॅम १६ सोन्याच्या अंगठ्या , ८ लाख रुपये किमतीच्या २०० ग्रॅम ३ सोन्याचे नेकलेस तसेच १० लाख रुपये रोख आणि ८ हजार रुपये किमतीचे डिव्हीआर असा एकूण ३४ लाख ८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत निलेश उर्फ बाळा अशोक पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पारोळा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार चोरटे धरणगाव रस्त्याकडून सागाच्या झाडांमधून साहेबराव पाटलांच्या बंगल्याकडे आले आणि कम्पाउंडची भिंतीवरून घरात प्रवेश केला. २ रोजी पहाटे २:३९ मिनिटांनी घरात प्रवेश करून ३:१४ मिनिटांनी म्हणजे ३५ मिनिटात चोरी करून बाहेर पडले.
डीवायएसपी विनायक कोते, एलसीबी पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे, पोलीस निरीक्षक सचिन सानप, एपीआय योगेश महाजन, हेडकॉन्स्टेबल कैलास साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथक, फॉरेन्सिक पथक, ठसे तज्ज्ञ याना बोलावून नमुने घेतले, चोरट्यांचा मागोवा घेतला.




