
पावसाचा खंड पडून नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – प्रा. सुभाष पाटील
अमळनेर:- मागील २२ दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे तालुक्यातील पिके करपून गेली असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाले आहेत. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान दहा हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील यांनी केली आहे.
अमळनेर तालुक्यात अखेर २२ दिवसांनी श्रावण सरी कोसळल्या असल्या तरी दीर्घकाळ चाललेल्या उन्हामुळे जमिनीतील ओलावा संपला होता. मका, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी यांसारख्या सर्वच पिकांची अवस्था बिकट झाली होती. शेतकऱ्यांचे सर्व पैसे शेतीत खर्च होऊन हंगाम अर्ध्याहून अधिक वाया गेला आहे.
दरम्यान, या वर्षीच्या पिकविमा योजनेतून “स्टिगर” वगळल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याची खंतही प्रा. पाटील यांनी व्यक्त केली. सालाबादप्रमाणे स्टिगरची तरतूद असती, तर तालुक्यातील २१ दिवसांचा पावसाचा खंड आपोआप विम्याला पात्र झाला असता आणि शेतकऱ्यांना मदत मिळाली असती. सरकारने स्टिगर रद्द करताना दिलेले आश्वासन तात्काळ पाळून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.




