
कळमसरे, नीम, वासरे, डांगरी गावाचा संपर्क तुटला, पिकांसह ग्रामस्थांची वाताहत…
अमळनेर :- तालुक्यातील मारवड व भरवस मंडळात काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. नाल्यांना पाणी येऊन रस्ते बंद झाल्याने कळसमरे, नीम, वासरे, डांगरी गावाचा संपर्क तुटला होता.
काल झालेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने मारवड मंडळ, भरवस मंडळात अतिवृष्टी झाल्याने पूर आल्यामुळे काही गावाचा संपर्क तुटला होता.
कळमसरे, नीम, वासरे, खेडी, मारवड, डांगरी, बोहरा परिसरातील फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला होता. तर वासरे, गावाला पाण्याचा वेढा पडल्याने गावात प्रत्येक गल्लीत पाणी वाहताना दिसून आले. भरवस येथील रेल्वे बोगद्यातुन पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पाडसे, खर्दे, चौबारी गावात पाण्यामुळे नुकसान झाले आहे. वादळ वारा असल्यामुळे वीज प्रवाह बंद झाला होता. मारवड, भरवस मंडळातील बऱ्याच गावातील पिकांचे या पावसाने मोठे नुकसान झाल्याचेही चित्र आहे.
मात्र जून ,जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले जोरदार वाहू लागले आहेत.यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत असली तरी नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.




