
अमळनेर:-तालुक्यातील लोण खुर्द येथे ३६ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाचा बोझा व नापिकीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना ९ रोजी घडली आहे.
मयत समाधान विजय पाटील (वय ३६) यांच्याकडे साधारण दोन बिघे शेती होती घरात अठरा विश्व दारिद्र्य असून अत्यल्प शेतीवर प्रपंच भागत नसल्याने बाहेर कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ९ रोजी दुपारी समाधान पाटील हे घरी नसल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता लोण खुर्द शिवारातील उमेश पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांची चप्पल आढळून आली. गावातील लोकांनी विहिरीत उतरून त्याचे प्रेत बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोझा वाढला होता. त्याच्यावर खाजगी फायनान्स कंपनी, हात उसनवारी व इतर कर्ज होते व त्यातूनच उद्दिग्न होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सदर मयत शेतकऱ्याच्या लहान भावाने ही ८ वर्षाआधी नैराश्यातून आत्महत्या केली होती. समाधान पाटील यांच्या मृत्यूमुळे घरात कर्ता उरला नसून म्हातारी विधवा आई, पत्नी, १२ वर्षीय मुलगा व १० वर्षाची मुलगी असे चौघेच उरले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.




