
अमळनेरला तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा
अमळनेर :- महाराष्ट्र राज्यात तालुका स्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येत असून “गाव करील ते राव काय करील” ही म्हण साध्य करून गावाचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा असे आवाहन उप मुख्यकार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण विभागाचे हेमंत भदाणे यांनी अमळनेर येथे तालुकास्तरीय कार्यशाळेत केले.
यावेळी गट विकास अधिकारी एन. आर. पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पाटील, गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे डी. डी. पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हेमंत भदाणे यांनी समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा व आपल्या गावाचा विकास साधावा असे यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पाटील यांनी यावेळी सांगितले की,समृद्ध पंचायतराज अभियानात कुण्या एकट्या पदाधिकारीचे काम नसून ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी ते ग्रामपंचायत अधिकारी यांच्या बरोबर गावातील नागरिकांचा सहभाग घेऊन यात आपल्या गावाचा विकास साधा. तुमच्या मदतीला तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी श्री. एन. आर. पाटील आहेतच. ही योजना तालुक्यातील प्रत्येक गावात राबवावी यासाठी गट विकास अधिकारी एन आर पाटील प्रयत्नशील असल्याने त्यांचेही यावेळी कौतुक केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एस. एस. कठाळे, मनरेगाचे किशोर ठाकरे, कृषी अधिकारी अमोल भदाणे, उमेद अभियानच्या तालुका व्यवस्थापक सीमा रगडे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सोनाबाई पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील मुख्य घटक यात सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध पंचायत, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजना, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोक सहभाग व श्रमदान, नावीन्यपूर्ण उपक्रम आदी मुद्देवर मार्गदर्शन करण्यात आले. यात कोटींचे बक्षीस यातून ग्रामपंचायतीना मिळणार असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी तालुक्यातील आठ ग्रामपंचायती यात गांधली, उदय नगर, कळमसरे, दहिवद, सुंदरपट्टी, जैतपीर, पिंपळी प्र. ज., पिंपळे खुर्द येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांना आय. एस. ओ. मानाकंन देऊन गौरवीण्यात आले.
या कार्यशाळेला प्रा.सुरेश पाटील, अनिल शिसोदे, प्रवीण पाटील, जे. के. पाटील, वर्षा युवराज पाटील,गांधली सरपंच नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील,जगदीश निकम,जितेंद्र राजपूत, नितीन पाटील, ग्रामसेवक रोजगार, बचत गटाच्या सी. आर. पी. तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची उपस्थिती होती.




