
दोन दिवसांआधी मुरूमचा डंपर पकडला मात्र कारवाईची माहिती देण्यास प्रभारी तहसिलदारांची टाळाटाळ…
अमळनेर:- तालुक्यात महसुलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने गौण खनिजाची खुली लूट सुरू असून दिवसाढवळ्याही बोरी, पांझरा नद्यांतून वाळूचे ट्रॅक्टर सुरू आहेत.
पावसाने सूट दिल्यानंतर महसूलकडूनही सूट मिळाल्याने वाळू व मुरूम उपश्याला ऊत आला असून पुन्हा संघटितपणे मोठ्या प्रमाणावर वाळू चोरीला सुरुवात झाली आहे. प्रती ट्रॅक्टर व डंपर मागे ठराविक बिदागी अदा करून ही खुली सूट दिल्याचे तालुक्याभरात बोलले जात असून संघटितपणे गौण खनिजाची लूट करण्याचा नवा मार्ग या झारीतल्या शुक्राचार्यांमुळे यंदा तालुक्याला मिळाला आहे. बोरी नदीतून रात्रीपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत बिनदिक्कत वाळू उपसा केला जात आहे. तर मूडी मांडळ परिसरात पांझरा नदीत रात्री जेसीबी व ट्रॅक्टरचा धुमाकूळ सुरू आहे. बोरी नदीतून ही ट्रॅक्टरद्वारे मोठा वाळू उपसा सुरू आहे. यावर महसूल सेवकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे हात कशाने बांधले आहेत ? ह्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक झाले आहे. त्यातच ठराविक वाहनाची बिदागी देत जास्त वाहने उतरवून सूट देणाऱ्यांचीही लूट केली जात असल्याची चर्चा जोरात आहे.
मुरूमच्या डंपरवरील कारवाईबाबत माहिती देण्यास टाळाटाळ…

दोन दिवसांआधी मुरुम वाहतूक करणारे डंपर गलवाडे रस्त्यावर अडवून ठेवण्यात आले होते. मात्र मुद्दाम अडवून ठेवल्याची बोंबाबोंब झाल्याने सदर डंपर तहसील आवारात जमा करण्यात आले. या कारवाईबाबत माहिती देण्याची विचारणा प्रभारी तहसीलदार सी यू पाटील यांना केली असता त्यांनी प्रांतांकडे बोट दाखवले. प्रांताधिकारी यांना कारवाई बाबत विचारणा केली असता मी सुपरवायझरी ऑफिसर असल्याचे सांगून जबाबदारी झटकत सुट्टीवर गेलेले तहसीलदार परत आल्यावर कारवाई करतील असे सांगितले. त्यामुळे सर्वच आलबेल सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या गोलमाल उत्तरातून दिसून येत आहे. असे कर्तव्यदक्ष अधिकारी अजून दोन चार वर्ष तालुक्याला लाभल्यास अमळनेर करांना बाहेर तालुक्यातून वाळू व गौण खनिज विकत आणावे लागेल यात शंका नाही.




