
पुढील सर्व निवडणुकीत मतदान केंद्रे वाढणार
अमळनेर : पुढील विधानसभा निवडणूक आणि आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान केंद्राची मर्यादा १२०० पर्यंत केल्याने अमळनेर विधानसभा मतदार संघात मतदान केंद्र वाढणार आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत घेतलेल्या बैठकीत दिली.
आयोगाच्या निर्देशानुसार पूर्वी मतदान केंद्राची मर्यादा १४०० पर्यंत असल्याने अमळनेर विधानसभा मतदार संघात अमळनेर शहरात ८३ , अमळनेर ग्रामीण मतदार संघात १९० आणि पारोळा तालुक्यातील ५२ असे एकूण ३२५ मतदान केंद्र होती.
मध्यंतरीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आयोगाने ९०० ते १००० मतदार अशी मर्यादा ठेवून मतदान केंद्राची निर्मिती करण्यात यावी असे निर्देश आल्याने प्रशासन कामाला लागले होते. अमळनेर तालुक्यात फक्त जिप पंस निवडणुकीसाठी ६४ मतदान केंद्र वाढणार होते. नवीन मतदान केंद्र कुठे असावे ,कसे असावे याचे सर्वेक्षण , पाहणी आणि अहवाल करता करता कर्मचाऱ्यांचे नाकेनऊ आले होते. बॅलेट युनिट , कर्मचारी संख्या वाढणार होती.
त्यांनतर पुढील विधानसभा निवडणुकीसाठी १४०० वरून मतदार मर्यादा १२०० करण्यात यावी असे निर्देश आल्याने आता अमळनेर विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राची संख्या वाढणार आहे.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सर्व राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना ही माहिती अवगत केली. यावेळी नायब तहसीलदार सी यु पाटील , नायब तहसीलदार प्रशांत धमके , प्रदीप महाले , किशोर साळुंखे , अक्षय सातपुते ,श्याम शिंपी या कर्मचार्यांसह भाजप चे योगेश महाजन , राहुल पाटील ,जिजाबराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस चे डी एम पाटील , प्रशांत निकम , भागवत पाटील , काँग्रेसचे बी के सूर्यवंशी , गजेंद्र साळुंखे , शिवसेनेचे सुरेश पाटील , संजय पाटील ,अधिकार पाटील , रिपाई चे यशवंत बैसाणे , वंचित बहुजन आघाडीचे दाजीबा गव्हाणे हजर होते.




