
अमळनेर :- तालुक्यातील रामेश्वर बु. येथील अल्प भूधारक शेतकरी संजय लोटन पाटील यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार होते. यात प्रोत्साहनपर अनुदान रक्कम रुपये ३३ हजार ६४५ रुपये हे डीबीटी पात्र शेतकऱ्याच्या खात्यात जमा न होता. ते भलत्याच्य खात्यावर जमा झाले आहेत. यामुळे खरा लाभार्थी गेले वर्षभरापासून जिल्हा बँकेच्या अमळनेर कर्ज शाखेच्या पायऱ्या झिजवतोय. ही चूक बँकेची अथवा डीबीटीची कोण्या एका कडून झाली आहे. त्याची शिक्षा मात्र रामेश्वरचा लाभार्थी शेतकरी लाभापासून वंचित राहत आहे.
चोपडा तालुक्यातील अडावद परिसरातील शेतकऱ्याच्या खात्यावर ते पैसे जमा झाले असल्याचे बँकेच्या संबंधीत अधिकारी यांनी सांगितले.
रामेश्वर बु. येथील संजय लोटन पाटील ३ बिघे बागायती शेती आहे. त्यांना मिळणाऱ्या अनुदानाचे पैसे अडावद भागातील शेतकऱ्याच्या खात्यात गेले आहेत. थेट लाभ हस्तांतरणाचे पैसे जो शेतकरी या योजनेस पात्र नसतांना, त्याच्या बँक खात्यात जमा झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे. ती चूक कोणाची? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. माझे पैसे माझ्याच खात्यात जमा व्हावेत. अशी मागणी रामेश्वरच्या संजय पाटील यांनी केली आहे. संजय लोटन पाटील यांचे खाते आधार लिंकशी जुळलेले आहे. त्यांची रक्कम नजरचूकीने खाते क्रमांक ८१२००१२०२००००९६५६ यावर जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्या ऐवजी ती रक्कम जेडीसीसी बँकेच्या अमळनेर कर्ज शाखेत खाते क्रमांक ८१२०७९२०२ १०६०५१६ या क्रमांकावर जमा झाली पाहिजे. अशी आर्त हाक रामेश्वर बु. च्या संजय लोटन पाटील या पात्र लाभार्थी शेतकऱ्याने दिली आहे.तर बँकेचे अधिकारी याबाबत त्यांना उडवा उडवीचे उत्तर देऊन वर्षभरापासून फिरवा-फिरव करीत आहे.
याबाबत तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी, संबधीत बँकेचे अधिकारी यांच्याशी वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पत्र व्यवहार केला आहे. तर बाजार समितीचे संचालक व पंचायत समितीचे माजी सभापती भोजमल पाटील यांनी सहकार मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हा बँकेच्या अनागोंदी कारभार विषयी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.




